पुणे- दरमहा विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना गेल्या चार महिन्यांपासून महावितरणने विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिध्दच केलेले नाहीत. त्यामुळे नियमाप्रमाणे दरमहा हे निर्देशांक प्रसिध्द करावेत अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाला पाठवलेल्या पत्रात वेलणकर यांनी म्हटले आहे की, वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे महावितरणने दरमहा विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिध्द करणे आवश्यक आहे. यातून ग्राहकांना किती तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागले व त्यामुळे किती काळ अंधारात बसावे लागले हे समजते. महावितरणने त्यांच्या संकेतस्थळावर सप्टेंबर २०२१ नंतर हे निर्देशांक गेल्या चार महिन्यांपासून प्रसिद्ध केलेले नाहीत.
महावितरणकडे त्यासाठी वारंवार तक्रार करावी लागणे दुर्दैवी असून तक्रार केल्यानंतर काही तासांत तीन तीन महिन्यांची माहिती प्रसिद्ध केली जाते. याचाच अर्थ महावितरणच्या कारभाराचे चित्र स्पष्ट होत असल्यामुळे माहिती प्रसिध्द करण्याचे टाळले जाते. त्यामुळे हे निर्देशांक नियमितपणे दरमहा प्रसिद्ध केले जावेत तसेच महावितरणच्या ढिसाळ कारभारात सुधारणा होण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी विवेक वेलणकर यांनी केली आहे.