पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून आव्हान देत मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत इशारा दिला होता. आता राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे मनसेचे नगरसेवक वसंत मोरे अडचणीत सापडले आहेत. मी राज ठाकरे यांच्यावर नाराज नाही. पण काय भूमिका घ्यावी, हे मला कळत नाही, अशी कबुली वसंत मोरे यांनी दिली आहे.
राज ठाकरे म्हणाले होते, माझा प्रार्थनेला विरोध नाही. नाही तर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.
वसंत मोरे म्हणले, ” माझ्या आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम मतदान जास्त आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत होऊ शकतो. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. रमजानचे दिवस आहेत, त्यामुळे शांतता पाळा. मी राज ठाकरे यांच्यावर नाराज नाही. पण काय भूमिका घ्यावी, हे मला कळत नाही” अशी कबुली वसंत मोरे यांनी दिली आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असेही वसंत मोरे म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या या वादग्रस्त भूमिकेची भाजपा वगळता सर्वच स्तरातून टीका होत आहे. राज्यात बेरोजगारी, महागाई विशेषत: पेट्रोल-डिझेल दरवाढ असे प्रश्न असताना धार्मिक, संवेदनशील मुद्दे उचलून समाजात तेढ निर्माण करण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न असल्याची टीका होत आहे. राज ठाकरेंवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात येत आहे.