मुंबई- पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज मुंबईत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नेमके काय घडले याचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही. मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
वसंत मोरे म्हणाले, “मी मनसेमध्ये होतो आणि मनसेमध्येच राहणार असून आजच्या भेटीनंतर 100% समाधानी आहे. उद्याच्या सभेत राज ठाकरे सर्व प्रश्नांना उत्तरं देणार असून पुढील चर्चा ही पुण्यात होईल असे देखील मोरे यांनी सांगितलं
आज राज ठाकरेंनी आपल्या निवासस्थानी शिवतीर्थावर बैठक बोलावली होती. या बैठकीला वसंत मोरे हजर होते. विशेष म्हणजे, वसंत मोरे हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे राज ठाकरेंनी तातडीने डॅमेज कंट्रोल करण्यात सुरुवात केली. याचा भागच म्हणून आजची बैठक आयोजित केली होती.
दरम्यान सर्व राजकीय पक्षांनी ऑफर दिल्यानंतरही आपण मनसेत राहणार असल्याची भूमिका वसंत मोरे यांनी स्पष्ट केल्यानं आता त्यांच्या राजकीय पक्षप्रवेशाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
काय आहे प्रकरण ?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे काढण्याची भूमिका जाहीर केली होती. एवढंच नाहीतर मोठाले स्पीकर लावून हनुमान चालिसा चालवण्याचे आदेशही राज ठाकरेंनी दिले होते. पण, त्यांच्या या निर्णयाला वसंत मोरेंनी स्पष्ट विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या राज ठाकरेंनी वसंत मोरे यांची शहराध्यपदावरून हकालपट्टी केली. वसंत मोरे यांच्यावर कारवाई झाल्यामुळे मनसेत खळबळ उडाली होती.