पिंपरी चिंचवड आयुक्तांच्या वाहनाच्या काचा फोडल्या, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तीचा राडा; धक्कादायक कारण आलं समोर
आज भारत देश आपला 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्य दिनाचा शासकीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शहरातील महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, पालकमंत्री हे उपस्थित असतात. पिंपरी चिंचवड मध्ये देखील महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडत असतानाच आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय वाहनाच्या काचा एका दिव्यांग नागरिकाने फोडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमकं कारण काय ?
सुरक्षारक्षकांनी तात्काळ या व्यक्तीला बाजूला घेत त्याची चौकशी केली. या चौकशीत विनायक सोपान ओव्हाळ, असे या दिव्यांग नागरिकाचे नाव असल्याचे समोर आले आहे. या नागरिकाने आयुक्त शेखर सिंह यांचा निषेध नोंदवण्यासाठी काचा फोडल्याचे सांगितले.
ओव्हाळ यांच्या मागण्यांकडे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सातत्याने दुर्लक्ष केलंय. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात महापालिक आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय वाहनाची काच पडून आपला निषेध नोंदवला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात दिव्यांग बांधवानी अचानक राडा घातल्याने महापालिकेतील उपस्थित सर्वांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. त्यांनी आयुक्तांवर आरोप केला आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रमाई आवास योजनेच्या लाभापासून डावलले आहे. आपण योजनेसाठी पात्र असूनही आपल्याला लाभ मिळालेला नाही. तसेच शहरातील दिव्यांग बांधवांच्या लहान मोठ्या व्यवसायांवर, टपऱ्यांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. त्याचाच निषेध नोंदवण्यासाठी दिव्यांग नागरिकाने आयुक्तांच्या गाडीच्या काचा फोडल्या.