महाविकास आघाडीने राज्यात अराजक सदृश परिस्थिती निर्माण न करता उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे – भाजपा प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांचे आवाहन
बदलापूर मधील दुर्दैवी घटनेचे राजकारण करू पाहणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना उच्च न्यायालयाने चपराक लगावली असून उद्याच्या महाराष्ट्र बंद ला परवानगी नाकारली आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये व नियोजित महाराष्ट्र बंद मागे घ्यावा असे आवाहन भाजपा चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केले आहे.
बदलापूर च्या दुर्दैवी घटनेत कायद्याच्या परिघात जे जे शक्य आहे ते सर्व राज्य सरकार ने केले आहे, त्यामुळे अनावश्यकरित्या ह्या घटनेचा गैरफायदा उठविण्याचा प्रयत्न निषेधार्य असून आता तर यावर उच्च न्यायालयानेच शिक्कामोर्तब केले आहे.
सामान्य नागरिकांना आवाहन करताना संदीप खर्डेकर म्हणाले की महाराष्ट्र पोलीस सक्षम असून असामाजिक तत्वांनी कोठे गडबड करण्याचा प्रयत्न केल्यास ते परिस्थिती व्यवस्थित हाताळतील.आपल्या देशात कायद्याचे राज्य असून नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरु ठेवावेत.आज अनेक नागरिकांनी संपर्क करून मुलांना शाळेत पाठवू का, दुकान उघडू का, हॉटेल चालू ठेवू का नको, असे प्रश्न विचारलेत. मी सामान्य नागरिकांना आवाहन करतो की कोणीही घाबरून जाऊ नये, आता केवळ उच्च न्यायालयाने बंद ला परवानगी नाकारली असे नाही तर त्याच बरोबर बंद करू पाहणाऱ्यांवर कारवाई करावी असेही स्पष्ट केले आहे.त्यामुळे महाविकास आघाडीने न्यायालयीन आदेशाचा मान राखून बंद मागे घेतला आणि तरीही कोणी परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास त्वरित पोलिसांना 112 क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केले आहे.