पुण्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा भूमिगत मेट्रोचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण पार पडलं. लाखो पुणेकर हे या मेट्रोच्या प्रतीक्षेत होते. रस्त्याच्या मार्गे जाताना लागणार 40 ते 50 मिनिटांचा प्रवास अवघ्या नऊ ते दहा मिनिटात होणार असल्याने आणि पुण्यातील सर्वात मध्यवर्ती अशी मेट्रो असल्यामुळे पुणेकरांना या मेट्रो मार्गाची आतुरता लागली होती. आणि आता अखेर ही मेट्रो पुणेकरांच्या सेवेत धावणार आहे. पाहूया मेट्रो कोणकोणत्या स्थानकावर थांबणार आहे आणि या मेट्रोचे दर काय असतील.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो मार्गीकेचं उद्घाटन आजच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं.
सुमारे 1,810 कोटी रुपये खर्च या मेट्रोसाठी आला आहे. तर या प्रकल्पामुळे पुणे मेट्रोचा पहिला टप्पा आता पूर्णत्वास येत आहे. मार्गावर नेमकी कोणती स्थानक आहेत आणि दर किती आहेत पाहूया
मेट्रोची सेवा ही रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे तर गर्दी जास्त असताना सात मिनिटांनी ही मेट्रो धावणार आहे. तर गर्दी कमी असताना दर दहा मिनिटांनी धावणार आहे.
जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ या प्रवासासाठी 10 रुपये तिकीट दर असेल तर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते मंडई मेट्रो स्थानकासाठी 15 रुपये तिकीट दर असेल. त्याचबरोबर
जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या प्रवासासाठी ही 15 रुपये आकारले जाणार आहेत.
याचाच अर्थ अवघ्या पंधरा रुपयात जवळपास तासभराचा प्रवास हा दहा मिनिटात पूर्ण करतात येणार आहे. त्याचबरोबर या भूमिगत मेट्रो सेवेमुळे नागरिकांना आता पिंपरी चिंचवड ते थेट स्वारगेट असा प्रवास करता येणार आहे. वनाज आणि रामवाडीचे हे प्रवासी इंटरजेंच करुन स्वारगेटला पोहचू शकणार आहेत.
पुण्यातील ही पहिली भूमिगत मेट्रो असल्यामुळे पुणेकरांमध्ये मेट्रोतून प्रवास करण्यासाठी उत्सुकता दिसून येत आहे. आज पहिल्याच दिवशी या मेट्रोला पुणेकरांचा भरघोस प्रतिसादही मिळाला आहे. त्यामुळे आता भविष्यातही या मेट्रोला पुणेकर असाच प्रतिसाद देतात का आणि या भूमिगत मेट्रोमुळे कोणाचा ट्रॅफिक कमी होतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.