‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’चा बिडकर पॅटर्न ! हजारो नागरिकांच्या समस्या मार्गी

245 0

गेली तीन वर्षे पुणे महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने लोकनियुक्त नगरसेवक नसल्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. छोट्या–मोठ्या नागरी समस्यांसाठी महापालिकेत वारंवार हेलपाटे घालावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सुरू केलेला ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ हा उपक्रम प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.

महापालिका अस्तित्वात नसतानाही सक्षम यंत्रणा उभी करून बिडकर यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवला आहे. पाणीपुरवठा, बांधकाम परवाने, मलनिःसारण, रस्ते, देखभाल-दुरुस्ती, पथ विभाग तसेच सांस्कृतिक विभागाशी संबंधित तक्रारी सोडवण्यासाठी नागरिकांना थेट अधिकाऱ्यांकडे जावे लागत होते. मात्र या उपक्रमामुळे नागरिकांचा एक फोन येताच तक्रारींची दखल घेऊन थेट जागेवर जाऊन समस्या सोडवण्याची कार्यक्षम यंत्रणा कार्यरत आहे.

यासंदर्भात नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, प्रशासन काळात नगरसेवक नसल्याने निर्माण झालेली पोकळी ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ उपक्रमामुळे भरून निघत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली टीम सातत्याने राबत असून, समस्या प्रलंबित न ठेवता तातडीने तोडगा काढण्यावर भर दिला जात आहे.

याबाबत बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “नगरसेवक हा प्रशासन आणि नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा असतो. नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळावी, या उद्देशातूनच ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ हा उपक्रम सुरू केला. महापालिका नसली तरी नागरिकांच्या समस्या थांबत नाहीत; त्यामुळे त्या सोडवणे ही आमची जबाबदारी आहे.”

या उपक्रमामुळे प्रभाग २४ मधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, प्रशासन काळातही लोकप्रतिनिधींची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचे हे ठळक उदाहरण ठरत आहे.

Share This News
error: Content is protected !!