देशात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले असून अशा अनेक घटना सध्या समोर येत आहेत. त्यातच आता पुणे जिल्ह्याला हादरवून टाकणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील एका खासगी शाळेतील शारीरिक शिक्षण म्हणजेच पी. टी. च्या शिक्षकानेच 13 वर्षीय विद्यार्थीनीवर तब्बल दोन वर्ष अत्याचार केले आहेत. या विद्यार्थिनी बरोबर स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील चाळे करत तिचा मानसिक छळ केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवृत्ती काळभोर असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पिंपरी चिंचवड शहरातील निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी ही पिंपरी चिंचवड मधील नामांकित शाळेत शिकते. 2022 ते 2024 दरम्यान या पी टी शिक्षक असलेल्या आरोपीने अल्पवयीन मुली बरोबर मुलीसोबत दुषकृत्य केले. तब्बल दोन वर्ष या मुलीने शिक्षकाच्या भीतीने या प्रकरणी कुठेही वाच्यता केली नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी या मुलीने सदर प्रकरणाची घरच्यांना माहिती दिल्यानंतर त्यांना हे प्रकरण समजले. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी ही गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
शिक्षकाने आधीही केले लैंगिक अत्याचार
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी शिक्षक निवृत्ती काळभोर याने या आधीही अशा प्रकारची दुष्कृत्य केली आहेत. या प्रकरणी 2018 मध्ये निगडी पोलीस ठाण्यात काळभोर विरोधात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचाराची गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यात दोषी आढळल्याने न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली होती. काही दिवसांपूर्वीच आरोपी शिक्षक जामिनावर बाहेर आला होता. अशा प्रकारच्या गुन्ह्यात दोषी आढळूनही शाळेने पुन्हा त्याला कामावर ठेवून घेतले. त्यामुळे या प्रकरणात संबंधित शाळा प्रशासन देखील अडचणीत येणार आहे.