पुण्यात वसुली करणाऱ्या ‘त्या’ पोलिसाचे निलंबन, तर वरिष्ठ निरीक्षकांची बदली, काय आहे प्रकरण ?

433 0

पुणे – दोन पोलीस निरीक्षकांमध्ये वादावादी झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षकांच्या नावाने वसुली करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. तर संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. हा प्रकार सिंहगड रोड पोलीस ठाण्यात घडला आहे.

श्रीधर पाटील असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या दोन निरीक्षकांमध्ये वसुलीवरून वादावादी झाली होती. त्यानंतर अवैध धंद्याचे पैसे गोळा करणारा कर्मचारी पाटील याला वरिष्ठ निरीक्षकांनी वसुली बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या वेळी पाटील यांनी नाराज होऊन ‘मी कोणालाच हे काम करू देणार नाही,’ अशी धमकी दिली होती.

अशा आशयाची बातमी प्रसिद्ध होताच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी बातमीची दखल घेऊन पोलिस निरीक्षकांना बोलावून घेतले. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची काही दिवसांत विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. यानंतर आता वरिष्ठ निरीक्षकांनी वसुली न करण्याचे आदेश दिल्यानंतर वादावादी करणाऱ्या पोलिस कर्मचारी पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी हद्दीत अवैध धंद्याना प्रोत्साहन देत असल्याचा ठपका ठेवून पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

Share This News
error: Content is protected !!