बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच पुण्यात याच प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्यासारखी घटना घडली आहे. स्कुल व्हॅन चालकाने सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर व्हॅनमध्येच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
संजय जेटिंग रेड्डी ( 45, वैदूवाडी, हडपसर) असं या नराधमाचे नाव असून त्याला वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. तर याबाबत पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहा वर्षीय पीडित मुलगी ही पुण्यातील नामांकित शाळेत शिकते. तिला आरोपी संजय याची स्कूल व्हॅन ने- आण करते. 30 सप्टेंबर रोजी ही मुलगी शाळेतून घरी आली असता मुलीला काहीतरी शारीरिक त्रास होत असल्याचे आईला जाणवले. त्यावेळी आईने तिच्या शरीराची तपासणी केली असता प्रायव्हेट पार्टवर जखमा झाल्याचे दिसले. घाबरलेल्या आईने चिमुकलीला जवळ घेऊन विचारपूस केली असता तिने तिच्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला.
चिमुकलीने सांगितली आपबीती
‘संजय अंकल हे रोज व्हॅन मधून घरी येताना आपल्याला त्रास देतात. आपल्या प्रायव्हेट पार्ट ला हात लावतात’, असं या मुलीने तिच्या आईला सांगितलं. एवढेच नाही तर तिच्याच स्कूल व्हॅनमधल्या तिच्या मैत्रिणीबरोबर देखील संजय असंच करतो, असं तिने सांगितलं. त्यावर या मुलीच्या आईने तिच्या वडिलांबरोबर मुलीला शाळेत पाठवलं. त्यानंतर मुलीच्या मैत्रिणीच्या म्हणजेच दुसऱ्या पिडीत मुलीच्या घरी जाऊन हा सर्व प्रकार सांगितला.
दुसऱ्या मुलीबरोबरही तेच
त्यावर दुसऱ्या मुलीच्या आईने देखील मुलीची तपासणी केली असता तिला प्रायव्हेट पार्टवर लालसर जखमा आढळल्या. त्या मुलीने देखील आरोपी संजय आपल्याला त्रास देत असल्याचं सांगितलं. त्यानंतर 2 सप्टेंबरला पालकांनी वानवडी पोलीस ठाणं गाठून संजय विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ही तात्काळ संजयला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा स्कूल व्हॅन मधून प्रवास करणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.