31ST PARTY IN PUB: पुण्यात थर्टी फर्स्टची अजब पार्टी; पबने पार्टीत येणाऱ्यांना वाटले कंडोम

31ST PARTY IN PUB: पुण्यात थर्टी फर्स्टची अजब पार्टी; पबने पार्टीत येणाऱ्यांना वाटले कंडोम

415 0

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि येत्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्ट अगदी जल्लोषात साजरा केला जातो. याच थर्टी फर्स्ट साठी शहरात ठीक ठिकाणी पार्ट्यांचं नियोजन करण्यात येतं. विविध हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार यांच्याकडून थर्टी फर्स्ट साठी खास पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. त्यासाठी काही स्पेशल पास, इनव्हिटेशन कार्ड तयार केले जातात. असंच इनव्हिटेशन कार्ड पुण्यातील एका पबने तयार केलं, ज्याची चर्चा राज्यभर होत आहे. कारण या कार्ड बरोबर पबने चक्क ‘कंडोम’ (condom) आणि ‘ओआरएस’चे (ORS) पाकीट देखील पाठवलं आहे. हा कारनामा पुण्यातील मुंढवा येथील ‘हाय स्पिरिट कॅफे’ (HIGH SPIRIT CAFE) या पबने केला आहे. त्यामुळे टिकेची झोड उठली आहे.

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात हा अजब प्रकार घडला आहे. थर्टी फर्स्ट च्या पार्टीचं आपल्या ग्राहकांना निमंत्रण देताना या पबने निमंत्रण पत्रिकेसह ‘कंडोम’ आणि ‘ओआरएस’चे पाकीट दिल्याने शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. मात्र या तक्रारीवर चक्क हॉटेल मॅनेजरने पोलिसांनाच उलट सवाल केला आहे.

आमचं काय चुकलं ?

पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच पब व्यवस्थापनाला संपर्क साधला. त्यावर ‘कंडोम वाटणं हा काही गुन्हा नाही. आम्ही सुरक्षेसाठी आणि जनजागृती व्हावे यासाठी हे सगळं करत आहोत. त्यासाठीच आम्ही निमंत्रण पत्रिकेसह कंडोम, सॅनिटरी पॅड्स वाटत आहे. यात आमचं काय चुकलं ?’, असा दावा संबंधित पबकडून करण्यात आला आहे.

काँग्रेस आक्रमक

पुण्यातील या पबचा अजब कारनामा पाहिल्यानंतर काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. संस्कृतीच्या राजधानीत असे स्वैराचाराला खतपाणी घालणारे प्रकार व्हायला नकोत, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी या संबंधी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. तर या घटनेनंतर पुण्यात पब कडून सुरू असलेल्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Share This News
error: Content is protected !!