पुणेकरांची ट्रॅफिकमधून सुटका होणार ? ‘या’ मुख्य रस्त्यांवर गुगलच्या मदतीने वाहतूक पोलीस राबवणार खास मोहीम
प्रत्येक पुणेकर सध्या शहरातील वाहतूक कोंडीने त्रस्त झाला आहे. हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी येत्या एक ऑगस्टपासून पुणे वाहतूक पोलिसांच्या वतीने एक नवीन मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी सर्वाधिक वर्दळीच्या मुख्य 32 रस्त्यांची निवड करण्यात आली असून या रस्त्यावर विविध उपक्रम राबवून ट्रॅफिक कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर या सगळ्यात गुगलची देखील मदत घेतली जाणार आहे.
पुणे शहरातील रस्त्यांची रुंदी कमी असून त्यातही फूटपाथवर अतिक्रमण झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना फूटपाथचा वापर करता येत नाही. पादचारांना रस्त्यावरून चालावे लागते. तर बंद पडलेल्या सिग्नल्समुळे, चुकीच्या सिग्नल्समुळे, अशास्त्रीय स्पीड ब्रेकर्स मुळे सगळ्याच रस्त्यांवर वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे हीच वाहतूक कोंडी आता कमी करण्यासाठी वाहतूक नियंत्रणाची साधने बसविणे, चौक सुधारणे, अद्ययावत सिग्नल यंत्रणा बसवणे, स्पीड ब्रेकर्स आणि पार्किंग मॅनेजमेंट, रस्त्याची सर्फेसिंग, अतिक्रमणे काढणे, नो हॉकर्स झोन करणे, मिसींग लिंक पूर्ण करणे, पाणी साठणाऱ्या ठिकाणांची दुरुस्ती, अशी कामे केली जाणार आहेत. त्यामुळे ट्रॅफिक कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
या रस्त्यांवर राबवणार मोहीम
पुण्यातील सिंहगड रस्ता, बाजीराव रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, शिवाजी रस्ता, महात्मा गांधी रस्ता, पौड रस्ता, सेनापती बापट रस्ता, शास्त्रीय रस्ता, पुणे विमानतळ रस्ता, आळंदी रस्ता, कोंडव्यातील मुख्य रस्ता, साधू वासवानी रस्ता, सोलापूर रस्ता- नगर रस्ता, खराडी बायपास ते मगरपट्टा रस्ता, सातारा रस्ता, कर्वे रस्ता, या रस्त्यांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निवड करण्यात आली आहे. पुणे महानगरपाल सर्व रस्त्यांवर नेहमीच वर्दळ असते, त्यामुळे या ठिकाणचे ट्रॅफिक कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना राबवल्या जाणार आहेत.
पुणेकरांसाठी खास ॲप बनवणार
वाहतूक कोंडी किंवा रस्त्याशी संबंधित इतर समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी एक मोबाईल ॲप विकसित केले जाणार आहे. ज्या ॲप द्वारे पुणेकरांना त्यांच्या भागातील वाहतूक समस्या नोंदवता येणार असून वाहतूक शाखेचे विभाग, महानगरपालिकेची क्षेत्रीय कार्यालय यांच्याशी समन्वय साधून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी वाहतूक शाखा गुगल सोबत करार देखील करणार आहे, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.