हवामान बदलामुळे पुणेकर पडले आजारी! पुण्यात झिकासह डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढले
पुणे शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. ज्यामुळे अर्थातच अस्वच्छता वाढली आहे. त्याचा थेट परिणाम पुणेकरांच्या आरोग्यावर होत आहे. पुणे शहरात झिकाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत तर दुसरीकडे व्हायरल फ्लू, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार देखील पसरत आहेत.
पुण्यात झिकाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. आज पुण्यातील रुग्णांची संख्या 23 वर पोहोचली असून यामध्ये सर्वाधिक रुग्ण या गर्भवती महिला आहेत. झिका पाठोपाठ शहरात डेंग्यूची साथ पसरत असल्याचे दिसून येत आहे. केवळ जुलै महिन्यात पुण्यात डेंग्यूचे एकूण 216 संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. तर या एका आठवड्यामध्ये 150 पेक्षा जास्त संशयित रुग्णांची संख्या आहे. तर चिकुनगुनियाचे १५ रुग्ण आढळून आले आहेत.
या आजारांचे मूळ कारण ठरत असलेल्या डासांची उत्पत्ती थांबवणे, हे महानगरपालिके समोरचे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने कीटकनाशके फवारणी सारख्या उपयोजना सुरू केल्या आहेत. मात्र या आजारांच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची आणि वृद्धांची विशेष काळजी घ्यावी. डास असलेल्या भागात जाणे टाळावे, डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी स्वच्छता ठेवावी, असे आवाहन देखील आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
गर्भवती मातांच्या चाचण्या सुरू
पुण्यातील झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दहा गर्भवती मातांचा समावेश आहे. झिका व्हायरसचा मातेच्या गर्भातील बाळाला धोका असतो. त्यामुळे आरोग्य विभागाने गर्भवती मातांच्या चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर मातांनी वेळोवेळी तपासण्या आणि सोनोग्राफी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी केले आहे.
