पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरात झिका आजाराच्या विषाणूंनी आपले हात पाय पसरायला पुन्हा सुरुवात केली आहे. झिकाच्या रुग्णसंख्येत काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून, एकूण रुग्णांची संख्या आता 103 वर पोहोचली आहे. चिंतेची बाब म्हणजे आत्ताही रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण जास्त आहे.
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यात झिकाचे तीन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण एरंडवणे क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील आहेत. ज्यामध्ये 19 वर्षीय महिलेसह 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि 59 वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे.
कोणत्या भागात किती रुग्ण 90 ?
याबाबत महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी माहिती दिली आहे. पुण्यातील डहाणूकर कॉलनी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झिकाचे सर्वाधिक म्हणजेच 20 रुग्ण आहेत. तर एरंडवणे हद्दीत 19 रुग्ण आणि खराडी मध्ये 13 रुग्ण आहेत. घोले रस्ता व पाषाण क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रत्येकी 9 रुग्ण असून, सुखसागरनगर व मुंडव्यात सात रुग्ण आहेत. याबरोबरच वानवडी मध्ये 5, कोरेगाव पार्क मध्ये 3, आंबेगाव बुद्रुक परिसरामध्ये 3, वानवडी 5, लोहगाव मध्ये दोन रुग्ण असून विश्रामबागाने धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एक रुग्ण आहे. तर एकूण रुग्णांपैकी 45 रुग्ण या गर्भवती महिला आहेत. त्यामुळे झिकाला रोखण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत.
झिकामुळे पाच मृत्यू ?
झिकाची लागण झालेल्या पुण्यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. हे पाचही रुग्ण ज्येष्ठ नागरिक होते. 95 वर्षीय महिला, 78 वर्षीय पुरुष, 76 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय पुरुष आणि 68 वर्षीय पुरुष रुग्णांचा यात समावेश आहे. या रुग्णांचा मृत्यू केवळ झीकामुळे झाला असल्याचा बातम्या व्हायरल होत होत्या मात्र या रुग्णांना इतर सहव्याधी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.