पुणे : पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) आता एक मोठी घडामोड समोर आली आहे. यामध्ये ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी आज पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत दोघांना अटक केली आहे.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर आरोपीची सकाळच्या वेळेत पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. ससूनमध्ये त्यावेळी ड्युटीवर असलेले सीएमओ डॉ. श्रीहरी हाळनोर आणि डॉ. अजय तावरे यांनी हे ब्लड सॅम्पलच बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे हा ब्लड रिपोर्ट बदलला गेला. थेट रक्तच बदलल्यामुळे या केसची दिशाच बदलण्याची शक्यता होती.
सुदैवाने पोलिसांनी दुसऱ्यांदा त्या मुलाचे ब्लड सॅम्पल घेऊन ठेवलेले होते आणि त्याची डीएनए चाचणी देखील करण्यात आली आहे. यातून हा सर्व प्रकार उघड झाला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी संध्याकाळी कारवाईचे सविस्तर प्लॅनिंग केलं आणि तावरे व हरनोर या दोघांना पहाटे त्यांच्या घरामधून अटक केली. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांना यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाल्याची चर्चा आहे. या दोघांना कोणी संपर्क साधला? त्यांच्यापर्यंत पैसे कोणी पोहोचवले? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.