Pune News

Pune News : श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ कडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

432 0

पुणे : अयोध्येतील गायक हेमंत ब्रिजवासी यांची भक्तिपूर्ण रामगीते, मनोहारी नृत्यातून उलगणारे रामायणातील प्रसंग, कर्णमधुर शंखनाद, गंगा घाटावरील महाआरती, या सगळ्याला उजळवून टाकणारी विद्युत रोषणाई अन फटाक्यांची आतषबाजी, अशा नयनरम्य सोहळ्यातून प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव सोमवारी पाहायला मिळाला.

शिवाजी माधवराव मानकर यांच्या पुढाकारातून फ्रेंड्स ऑफ बीजेपीतर्फे प्रभू श्रीराम महाआरती व अध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्समध्ये आयोजन केले होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपकभाऊ मानकर, भारतीय जनता पक्षाचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक आघाडीच्या प्रमुख प्रिया बेर्डे, संयोजक शिवाजी माधवराव मानकर, ऍड. मंदार जोशी, अमित जाधव, विजय आढाव, यश वालिया, ऍड. नितीन साबळे, अभिजीत देशपांडे, राज जैन, सुरज शर्मा आदी उपस्थित होते.

शिवाजी माधवराव मानकर म्हणाले, “अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम आज अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले. या सोहळ्याने संपूर्ण देश राममय झाला आहे. ढोल-ताशा वादन, हेमंत ब्रिजवासी यांच्या मधुर आवाजातील रामगीते, जयपूर येथील नृत्य समूहाचे रामायणावरील विलोभनीय नृत्याविष्कार सादर झाले. शंखनाद, गंगा घाट आरती, धुपआरती आणि फटाक्यांच्या आतषबाजीने हा आनंदोत्सव द्विगुणित झाला.”

चंद्रकांत पाटील म्हणाले, “आजचा आनंदसोहळा अवर्णनीय आहे. प्रत्यक्ष प्रभू राम आपल्यात आले आहेत, अशा भावना देशवासीयांच्या आहेत. प्राणप्रतिष्ठा झालेली रामलल्लाची मूर्ती अतिशय बोलकी आहे. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीराम आज भव्य राम मंदिरात विराजमान झाले आहेत. खऱ्या अर्थाने राजराज्याला सुरुवात झाली आहे. हे केवळ देवाचे मंदिर नसून, जीवन जगण्याचा वस्तुपाठ आहे. संबंध भारताला आणि विश्वाला दिशा देणारा आजचा सोहळा आहे. कुटुंबपद्धती, योग, ध्यानधारणा, कडधान्य आणि भारतीय संस्कृतीचे महत्व अधोरेखित होत आहे. दरवर्षी आजच्या दिनी हा आनंदोत्सव साजरा व्हावा.”

दीपकभाऊ मानकर म्हणाले, “अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम आज अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले. सामाजिक बांधिलकी, हिंदू धर्म संस्कृती जपणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला प्राणप्रतिष्ठा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. लोकांच्या अंतरंगात भगवंताची ओढ देशभर दिसत आहे. प्रभू श्रीरामाची देशभर मनोभावे भक्ती, सेवा होत आहे. शिवाजी मानकर यांनी आयोजिलेला हा नेत्रदीपक असा सोहळा आहे.”

शिवाजी माधवराव मानकर म्हणाले, “आजच्या सोहळ्याने संपूर्ण देश राममय झाला आहे. ढोल-ताशा वादन, हेमंत ब्रिजवासी यांच्या मधुर आवाजातील रामगीते, जयपूर येथील नृत्य समूहाचे रामायणावरील विलोभनीय नृत्याविष्कार सादर झाले. शंखनाद, गंगा घाट आरती, धुपआरती आणि फटाक्यांच्या आतषबाजीने हा आनंदोत्सव द्विगुणित झाला.” संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Share This News
error: Content is protected !!