Pune News : पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तिघी तरुणींवर अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संभाजीनगरहून आलेल्या विवाहित महिलेला मदत केल्याच्या कारणावरून या तरुणींना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीदरम्यान त्यांच्याशी जातिवाचक, आक्षेपार्ह भाषेत बोलण्यात आले आणि मारहाणही (Pune News) झाल्याचा आरोप या तरुणींनी केला आहे.
संबंधित घटना अशी घडली की, संभाजीनगरमधील एक विवाहित महिला कौटुंबिक त्रासामुळे पुण्यातील मैत्रिणींकडे एका दिवसासाठी राहायला आली होती. तिची अनुपस्थिती लक्षात आल्यावर तिच्या हरवल्याची तक्रार स्थानिक पोलिसांत दाखल झाली. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलीस कोथरुडमध्ये पोहोचले. त्यानंतर संबंधित महिलेला शोधून काढण्यात आलं आणि तिच्यासोबत राहणाऱ्या तीन तरुणींना पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेलं.
या तीन मुलींच्या म्हणण्यानुसार, चौकशी दरम्यान पोलिसांनी त्यांच्याशी अवमानकारक भाषेत संवाद साधला, त्यांचे कपडे आणि वागणूक यावरून टीका केली, आणि जातिवाचक शिवीगाळ करत शारीरिक दमदाटी केली. पीडितांपैकी एका मुलीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत हा संपूर्ण प्रकार जगजाहीर केला आहे.
या आरोपांमध्ये कोथरुड पोलीस ठाण्याच्या एका महिला अधिकाऱ्यांसह संभाजीनगर पोलीस ठाण्याचे एक अधिकारीही सामील असल्याचं नाव पुढे आलं आहे. पोलिसांकडून मात्र सर्व आरोप फेटाळण्यात आले असून, “फक्त चौकशीसाठी प्रश्न विचारण्यात आले, कोणतीही मारहाण किंवा असभ्य भाषा वापरण्यात आलेली नाही,” असे त्यांचे म्हणणे आहे.
सुप्रिया सुळेंची तीव्र प्रतिक्रिया
घटनेची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “माझ्या व्हॉट्सअॅपवर या प्रकरणासंबंधी व्हिडीओ आला असून, जर यात तथ्य असेल, तर ही अतिशय धक्कादायक बाब आहे. गृहमंत्रालयाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.”
या प्रकरणामुळे पुण्यात पुन्हा एकदा पोलीस वर्तनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पोलिसी चौकशी आणि मानवतेचा समतोल राखण्याची गरज अधोरेखित करणारी ही घटना आता राज्यव्यापी चर्चेचा विषय बनली आहे.