आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय ठरेल-उपमुख्यमंत्री अजित पवार

462 0

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ‘सेवा कमतरता विश्लेषण’ (गॅप ॲनालिसीस) योजनेच्या माध्यमातून खरेदी केलेल्या या उपकरणांमुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा अधिक भक्कम आणि बळकट होण्यास होईल. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेचे हे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

विधानभवन येथे पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ‘गॅप ॲनालिसीस’ योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या उपकरणांच्या प्रदर्शनाची पाहणी श्री.पवार यांनी केली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, जिल्हा परिषदेचा स्वनिधी, सामाजिक संस्थांनी केलेली मदत, उद्योग क्षेत्राच्या सामाजिक दायित्व निधीतून आरोग्यसेवेसाठी आवश्यक असलेल्या या उपकरणांची खरेदी करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात स्थानिक पातळीवरंच अद्ययावत उपचार उपलब्ध करून देणे शक्य होईल आणि गोरगरिबांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल. जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था सक्षम करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

वैद्यकीय उपचारांसाठी अत्याधुनिक यंत्रणा, उपकरणांप्रमाणेच तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचीदेखील आवश्यकता असते. प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी सर्व प्रयत्न करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, या सुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले.

Share This News
error: Content is protected !!