पुणेब्रेकिंग न्यूज

मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडी दोन दिवसांची वाढ; वकिलांनी काय युक्तिवाद केला वाचा सविस्तर 

मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडी दोन दिवसांची वाढ; वकिलांनी काय युक्तिवाद केला वाचा सविस्तर

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर ला पुन्हा एकदा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मनोरमा खेडकर यांनी मुळशीतील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने पोलिसात गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर मनोरमा खेडकर यांना महाड मधून पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना चार दिवसांशी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्या कोठडीत आज पुन्हा दोन दिवसांशी वाढ करण्यात आली आहे.

वकिलांचा युक्तिवाद काय ?

याप्रकरणी मनोरमा खेडकर यांचे वकील सुधीर शहा यांनी कोर्टात युक्तिवाद केला. ‘या प्रकरणांमध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम 307 लावण्यात आले आहे, मात्र हे कलम लागू होत नाही. ते कलम काढून टाकावे. उर्वरित कलमे जामीनपात्र आहेत. त्यामुळे पोलीस कोठडी वाढवण्यात येऊ नये’, अशी बाजू आरोपीच्या वकिलांनी मांडली. तर यावर सरकारी वकील अमर ननावरे यांनी युक्तिवाद केला. ‘मनोरमा खेडकर यांचे साथीदार, व्हिडिओ दिसणारे इतर लोक आणि घटनास्थळावरील कंटेनर संबंधीचा तपास करायचा आहे. त्यामुळे खेडकर यांच्या कोठडीत वाढ, अशी मागणी सरकारी वकीलांनी केली होती. त्याचबरोबर आरोपी मनोरमा खेडकर यांनी तक्रारदाराच्या डोक्याला पिस्तूल लावलं होतं, आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती, असा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अखेर न्यायालयाने मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.