पुणे- शिंदवणे घाटातून उरळीकांचनच्या दिशेने निघालेल्या पीएमपीएल बसचा ब्रेक अचानक फेल झाला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील २२ प्रवाशांचा जीव वाचला. ही घटना आज शुक्रवारी सकाळी 7 वाजता घडली.
सासवडहून पीएमपीएल बस ही शुक्रवारी सकाळी उरळीकांचनच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये 22 प्रवासी होते. बस घाटातील उतारावर असलेल्या मंदिराजवळ आली असता बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालक किशोर कदम यांच्या लक्षात आले. मात्र त्यांनी घाबरून न जाता या प्रसंगाचा सामना करण्याचा निश्चय केला. कारण त्यांच्या हातात २२ प्रवाशांच्या जीवाचे भवितव्य होते.
त्यांनी बसवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. बस थांबण्यासाठी त्यांनी दोन वेळा वळणावर बस धडकवली. वेग कमी झाल्यावर त्यांनी बसवर नियंत्रण मिळवले. किशोर कदम यांचा आत्मविश्वास आणि प्रसांगवधान यामुळे 22 प्रवाशांचा जीव वाचला. एवढेच नाही तर प्रवाशांना साधे खरचटले देखील नाही.