पिंपरीत (PIMPRI VIRAL VIDEO) मध्यरात्री भर रस्त्यात गाडी पार्क करून मोठ्या आवाजात डीजे लावून धुडगूस घालणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. ही घटना पिंपळे निलख या ठिकाणी घडली असून घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.
पिंपळे निलख परिसरातील न्यू डी.पी. रोडवर मध्यरात्री काही हुल्लडबाज तरुणांनी रस्त्याच्या मधोमध कार लावली. कारचे दरवाजे उघडे ठेवून मोठ्या आवाजात स्पीकर लावला. गाण्यांवर नाचत कारच्या छतावर बसून रस्त्यातच गोंधळ घातला. हा प्रकार बराच वेळ सुरू असल्याने आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांची झोपमोड झाली. अखेर एका सजग नागरिकानं या घटनेचा व्हिडिओ काढून सांगवी पोलिसांना माहिती दिली. पुढच्या काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या हुल्लडबाजांना जमिनीवर बसवून पोलिसांनी चांगलाच चोप दिला. त्यामुळे याच प्रकरणाचा बिफोर आणि आफ्टर चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याचबरोबर पोलिसांनी तात्काळ नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत घटनास्थळी पोहोचून या टोळक्याला अद्दल घडवल्यानं पोलिसांचंही कौतुक होतंय.