आळंदी- समस्त वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पायी वारी करून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला असतो. कोरोनामुळे गेली दोन वर्ष आषाढी पायी वारीच्या (Ashadhi Wari) सोहळ्यात खंड पडला. मात्र मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही परंपरा कायम राखली गेली. पण आता कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्यात आल्यामुळे यंदा पायी पालखी सोहळा पुन्हा त्याच दिमाखामध्ये रंगणार हे निश्चित झाले आहे. यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 21 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक झाली. पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीस श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई, विश्वस्थ डॉ. अभय टिळक, हभप नामदेव महाराज वासकर, राणू महाराज वासकर, श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ माऊली जळगावकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी, सचिव मारुती कोकाटे, बाळासाहेब रंदवे, भागवत चवरे, भाऊ फुरसुंगीकर, सोपानकाका टेंबुकर, गुरुजीबुवा राशिनकर, शरद गायकवाड, बाळासाहेब उकळीकर, एकनाथ हांडे, दिनकर वांजळे, राजाभाऊ थोरात, बाळासाहेब वांजळे, व्यवस्थापक माऊली वीर, सह व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्यासह दिंडी प्रमुख आणि फडकरी उपस्थित होते.
या बैठकीत पायी वारीचं वेळापत्रक सादर करण्यात आले. यंदा पालखी सोहळ्यात तिथीची वाढ झाली आहे. त्यामुळे लोणंदमध्ये अडीच दिवस तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी मुक्कामी असेल. दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या सही शिक्क्यानं वाहन पास दिले जातील, अशीही माहिती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी दिली आहे. एकूणच या बातमीने वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
असा असणार आषाढी पायी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम
मंगळवार दिनांक 21 जून रोजी सायंकाळी 4 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार दिनांक 22 आणि गुरुवार दिनांक 23 रोजी पुणे, शुक्रवार दिनांक 24 आणि शनिवार दिनांक 25 रोजी सासवड, रविवार दिनांक 26 रोजी जेजुरी, सोमवार दिनांक 27 रोजी वाल्हे, मंगळवार दिनांक 28 आणि बुधवार दिनांक 29 रोजी लोणंद, गुरुवार दिनांक 30 रोजी तरडगांव, शुक्रवार दिनांक 1 आणि शनिवार दिनांक 2 जुलै रोजी फलटण, रविवार दिनांक 3 रोजी बरड, सोमवार दिनांक 4 रोजी नातेपुते, मंगळवार दिनांक 5 रोजी माळशिरस, बुधवार दिनांक 6 रोजी वेळापूर, गुरुवार दिनांक 7 रोजी भंडीशेगाव, शुक्रवार दिनांक 8 रोजी वाखरी तर शनिवार दिनांक 9 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी सोहळा पोहोचेल. रविवार दिनांक 10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे 27 तर रथामागे 251 दिंड्या नोंदणीकृत आहेत. तसेच नोंदणी नसलेल्या 125 ते 150 दिंड्या आहेत. सोहळ्यातील या दिंड्यांना वाहन पास दिले जातील. वाहन पासाचा गैरवापर टाळण्यासाठी नोंदणीकृत दिंडी चालकाने 15 मेपर्यंत वाहनांचे नंबर, वाहन चालकाचे नाव आणि मोबाईल नंबर संस्थानकडे द्यावेत. यंदा माऊली सोबत सुमारे पाच लाख समाज राहिल. त्यादृष्टीने पालखी तळ, आरोग्य, पाणी, वीज, रस्ता आणि सुरक्षा याबाबत शासनाकडे योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असं पालखी सोहळा प्रमुख ॲड . विकास ढगे पाटील म्हणाले.