निलेश माझिरे पुन्हा मनसेत ! राज ठाकरेंनीच केली ‘या’ पदावर नियुक्ती

451 0

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरु आहे. पक्षाचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे यांनी पक्षांतर्गत बेबनावाला कंटाळून पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. आता निलेश माझिरे यांची नाराजी राज ठाकरे यांनी दूर केली आहे.

निलेश माझिरे वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. माझिरे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली होती. शिवसेना नेते सचिन अहिर यांनीही काही दिवसांपुर्वी निलेश माझीरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती.

मात्र वसंत मोरे यांनी शिष्टाई करत माझिरे यांना घेऊन थेट शिवतीर्थ गाठले. आता निलेश माझिरे यांची मनधरणी करण्यात यश आले असून त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी स्वतः निलेश माझिरे यांच्यावर माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे. राज ठाकरेंनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. त्यामुळे वसंत मोरेंचा मावळा परतला असे म्हणता येईल.

Share This News
error: Content is protected !!