पुणे : पुणे शहरात लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पुणे लोकसभेची निवडणूक ही एकतर्फी होईल आणि मोठ्या मताधिक्याने आपण निवडून येऊ, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे आणि हीच परिस्थिती सत्यात उतरवण्यासाठी ते सर्वोतोपरी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. कदाचित याचीच सुरुवात त्यांनी पक्षातील इतर नेत्यांच्या भेटीगाठी घेत केली आहे. ज्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळाल्यानंतर नाराज झालेले माजी आमदार जगदीश मुळीक असतील किंवा मग दशकापासून मतभेद असलेल्या राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार मेधा कुलकर्णी असतील. या दोघांसह इतर अनेक नेत्यांच्या भेटी मुरलीधर मोहोळ यांनी घेतल्या आहेत.
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून बेरजेचे राजकारण करण्यात येत आहे. मोहोळ यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात जमून जल्लोष केला. दुसऱ्या दिवशी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. पण यावेळी लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या इतर नेत्यांनी गैरहजेरी लावली. जगदीश मुळीक यांच्या अनुपस्थितीच्या चर्चा सर्वाधिक रंगल्या. मुळीक यांचे नाव लोकसभेच्या शर्यतीत मोहोळ यांच्या बरोबरीने घेतले जात होते. दोघांकडूनही विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पक्ष श्रेष्ठींना खुश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. अंतिमतः पक्षाने मोहोळ यांना उमेदवारी दिली. ज्यामुळे नाराज झालेले जगदीश मुळीक एक दिवस “नॉटरीचेबल” होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पोस्टही केली. ज्यामुळे या नाराजीच्या चर्चा आणखी रंगू लागल्या. मात्र लगेचच मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः जगदीश मुळीक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. मुळीक यांच्या कुटुंबीयांनी मोहोळांचे औक्षणही केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली ज्याची छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाली.
दुसरीकडे कोथरूड या एकाच मतदार संघात भाजपचे दोन प्रसिद्ध चेहरे आहेत. पहिला चेहरा अर्थात महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ तर दुसरा चेहरा नवनिर्वाचित खासदार मेधा कुलकर्णी या आहेत. एकाच मतदार संघात काम करत असल्यामुळे कुलकर्णी आणि मोहोळ यांच्यात अनेक वेळा पक्षांतर्गत कलह झाले. काही वेळा हे कलह उमेदवारीवरून तर काही वेळा पदांच्या वाटपावरूनही झाले. मोहोळ – कुलकर्णी यांच्या कलहाच्या बातम्या अनेक वेळा प्रसिद्ध झाल्या. मात्र हे अंतर्गत कलह विसरून मोहोळ यांनी मेधा कुलकर्णी यांचीही भेट घेतली.
2019 च्या विधानसभा निवडणुकांवेळी मोहोळ आणि कुलकर्णी यांच्यातील संघर्ष टोकाला गेले होते. मेधा कुलकर्णी यांचा बालेकिल्ला असलेला कोथरूड मतदारसंघ त्यांच्याकडून काढून घेण्यात आला. त्याजागी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली गेली. ज्यामुळे कुलकर्णी दुखावलेल्या होत्या. काही कार्यक्रमांमध्ये आणि कार्यक्रम पत्रिकांमध्ये त्यांचा नामोल्लेख टाळण्यात आला. यावरून मेधा कुलकर्णींनी चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र याच नाराजीचा फटका लोकसभेत बसू नये, याची खबरदारी घेत भाजपने मेधा कुलकर्णी यांची नियुक्ती थेट राज्यसभेवर केली. ज्यामुळे कुलकर्णींची नाराजी दूर झाली. मुरलीधर मोहोळ यांनी मेधा कुलकर्णी यांची भेट घेतली. त्यावेळी कुलकर्णी यांनी त्यांचे औक्षणही केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मेधा कुलकर्णी यांचे 2019 च्या विधानसभेचे तिकीट कापल्यानंतर ब्राह्मण मतदार भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. पण कुलकर्णींना राज्यसभेवर घेऊन भाजपने ब्राह्मण समाजाची वोट बँक सेफ केली. तर दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने मराठा समाजाला प्रतिनिधित्व दिले. ज्यामुळे मराठा मतदार यांची नाराजी दूर झाली. भाजपमध्ये जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहोळ असे दोन गट अप्रत्यक्षरीत्या पडलेले होते. पण मोहोळ यांनी मुळीकांची भेट घेत पक्षात सर्वकाही अलबेल असल्याचे भासवून दिले. ज्यामुळे कार्यकर्ते आणि मतदार यांच्यातील संभ्रम दूर झाला. मुळीक यांची नाराजी खरंच दूर झाली का, याबाबत खात्री देता येत नाही. पण मतदारांसमोर आणि विरोधी पक्षासमोर असेच भासवण्याचा प्रयत्न होत आहे. यासोबतच मुरलीधर मोहोळ यांनी माजी आमदार विजय काळे, माजी खासदार आणि आपले राजकीय गुरू अनिल शिरोळे, सिद्धार्थ शिरोळे, माजी शहराध्यक्ष योगेश गोगावले, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक आणि स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. पक्षाची एकजूट दाखवण्यासाठी आणि सर्व नेत्यांच्या सोबत असलेल्या मतदारांचे रूपांतर मतांमध्ये करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी या गाठीभेटी घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या काळात हे सर्व नेते मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करताना पाहायला मिळणार का? आणि या गाठीभेटींचा मोहोळ यांना फायदा होणार का ? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर – समृद्धी जाधव