बावधनमध्ये सिमेंट पोत्यात आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले

590 0

पिंपरी- हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन येथील नाल्यात सिमेंट पोत्यात भरलेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या खुनाचे गूढ उलगडले असून किरकोळ वादातून या इसमाचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

राजू दीनानाथ महातो असे खून झालेल्या इसमाचे नाव असून सुनील मुन्ना चौहान, मुन्ना फुनी चौहान, योगेंद्र श्री गुल्लेराम आणि बरिंदर श्री गुल्लेराम अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आणि मारेकऱ्यांना शोधून काढण्याचे मोठ आव्हान हिंजवडी पोलिसांसमोर होते. मात्र सीसीटीव्ही फुटेज मधील एका दुचाकी सोबत असलेल्या इसमाच्या संशयास्पद हालचालीवरून हिंजवडी पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीच्या मारेकऱ्यांना शोधून काढले.

महातो हा आरोपींच्या बरोबर बिगारी काम करत असे. आरोपी सुनील चौहान याचे महातो याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून सुनील चौहान याने महातो याचा गळा आवळुन खून केला. इतर आरोपींनी त्याचा मृतदेह गोणीत भरला आणि पुणे-मुंबई महामार्गावर बावधन जवळील एका नाल्यात फेकून दिला. मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी तपास सुरु करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Share This News
error: Content is protected !!