वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणांमध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत. मात्र पूजा खेडकर यांचे प्रकरण बाहेर आल्यानंतर राज्यातील आणि देशातील अनेक बनावट अधिकारी आणि त्यांचे प्रताप समोर येत आहेत. अशीच आणखीन एक अधिकारी पुण्यात आढळून आली आहे.
पुण्यातील वडकी परिसरात राहणाऱ्या रेणुका ईश्वर करनुरे या महिलेने आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगून अनेक नागरिकांवर दबाव टाकून जास्तीचे पैसे उकळल्याचे आढळून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेणुका करनुरे नावाची ही महिला लोकांना व्याजाने पैसे देते. दरमहा दहा टक्के व्याजाने पैसे दिले जातात. जवळपासच्या परिसरातील अनेक महिलांना तिने अशाच प्रकारे पैसे दिले आहेत. परिसरातील अनेक महिलांना व्याजाने पैसे दिले. यापैकीच एका 31 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात करनुरे हिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिने दोन लाख 67 हजार रुपये पीडित महिलेला व्याजाने दिले होते. त्याची परतफेड म्हणून पीडित महिलेने आतापर्यंत तीन लाख 48 हजार रुपये परत दिले आहेत. तरी देखील रेणुका ही आणखी चार लाख 55 हजार रुपयांची मागणी करत आहे. पैसे द्यायला नकार दिल्यास ‘मी आयएएस अधिकारी आहे माझ्या नादाला लागू नका. माझे पैसे मला ताबडतोब हवे आहेत’, अशाप्रकारे धमकी देत आहे.
अखेर रेणुका हिच्या त्रासाला कंटाळून या महिलेने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी आता बनावट आयएस अधिकारी रेणुका ईश्वर करनुरे हिच्यावर लोणी काळभोर पोलिसांत अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारी मध्ये किती तथ्य आहे ? आणि रेणुका ने आणखी किती लोकांकडून अशाच प्रकारे धमकावून पैसे उकळले आहेत याचा पोलीस तपास करत आहेत.