पुणे- महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये आज, बुधवारी (दि. २३) सकाळी ६ वाजताच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे भोसरी व आकुर्डीमधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या बंद आहे. विजेच्या वाढत्या मागणीमुळे भारव्यवस्थापन शक्य होत नसल्याने पर्यायी वीजपुरवठ्याची सोय देखील उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र महापारेषणकडून या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड शोधण्याचे काम जलदगतीने सुरु असून त्याबाबत दुपारपर्यंत स्थिती स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, सध्या पर्यायी किंवा इतर तांत्रिक उपाययोजनेतून वीजपुरवठा कमीत कमी कालावधीसाठी बंद राहील यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र विजेच्या वाढत्या मागणीमुळे भारव्यवस्थापनात अडचणी येत आहे. त्यामुळे भोसरी विभागातील इतर ग्राहकांनी विजेचा कमीत कमी वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
याबाबत माहिती अशी की, भोसरीमधील गवळी माथा येथे महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रामध्ये १०० एमव्हीए क्षमतेचे दोन व ७५ एमव्हीए क्षमतेचा एक असे एकूण तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. मात्र त्यातील १०० एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मरद्वारे महावितरणच्या एकूण २६ वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येतो.
मात्र यातील १०० एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या एकूण १० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी प्रामुख्याने भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील ४५०० औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे. महावितरणकडून याबाबत संबंधित सर्व ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे.
महापारेषणकडून बिघाड झालेल्या १०० एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची सध्या तपासणी सुरु आहे. त्यामध्ये हा ट्रान्सफॉर्मर पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्यास आल्यास तो बदलण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महापारेषणच्या २२० केव्ही उपकेंद्रात सध्या सुरु असेलल्या एकमेव ७५ एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधून त्यावरील १६ वीजवाहिन्यांसह सध्या बंद असलेल्या १० वीजवाहिन्यांना देखील पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा द्यावा लागणार आहे. या कालावधीत भोसरी विभागातील वीजपुरवठ्याची स्थिती अधिकच विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
एकाच पॉवर ट्रान्सफॉर्मरवरून विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने भोसरी विभागात चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करून सर्व ग्राहकांना वीजपुरवठा करावा लागणार आहे. मात्र अशी स्थिती १०० एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्यासच उद्भवू शकते अशी माहिती महापारेषणकडूनन देण्यात आली. तथापि याबाबत नेमकी स्थिती दुपारपर्यंत स्पष्ट होणार असून त्याबाबत वीजग्राहकांना अवगत करण्यात येणार आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरण यांच्याकडून करण्यात आले आहे.