मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाची मर्यादा पाळली जाईल, पुण्यात मुस्लिम संघटनेचा निर्णय

460 0

पुणे- मशिदीवरील भोंग्यांना परवानगी असेल तर ते काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र आवाजाची मर्यादा पाळली जाईल अशी भूमिका पुण्यातील मुस्लिम संघटनांनी घेतली आहे. पुण्यातील आझम कॅम्पस येथे मुस्लीम समाजातील मंडळींची बैठक पार पडली. यावेळी राज्य सरकारच्या नियमांचे पालन केले जाईल असा निर्णय घेण्यात आला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यावरुन राज्याच्या राजकारणात प्रचंड गदारोळ निर्माण झाला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्य सरकारला राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला असून पुणे दौऱ्यातही आपल्या या अल्टिमेटचा पुनरुच्चार केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर पुण्यातील आझम कॅम्पस येथे मुस्लीम समाजातील मंडळींची बैठक पार पडली.

यावेळी पी.ए.इनामदार म्हणाले की, “आम्ही दिवसभरात पाच वेळा नमाज पठण करतो आणि त्याचवेळी अजान होते. ही अजान सात ते आठ मिनिटांसाठी असते. पण तरीदेखील सध्या जे काही सतत भोंगे किंवा स्पीकरबाबत आवाहन केले जात आहे, त्याचा विचार करता न्यायालयं आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे यापुढील काळात पालन केले जाईल. आम्ही या नियमांची अंमलबजावणी करणार आहोत”.

निवडणूक जवळ येत असल्याने अशा गोष्टी घडत आहेत. मी त्यावर भाष्य करणार नाही. मंदिराच्या विश्वस्तांनीही यामध्ये सहभागी व्हावे. शांतता नांदली पाहिजे, वितुष्ट असता कामा नये. म्हणून ही बैठक बोलावण्यात आली आहे. वादाचे प्रकार घडणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असे इनामदार म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!