पुणे – तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर चाकण एमआयडीसीतील मर्सिडीज बेन्झ कंपनीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला (Forest Department ) यश आले आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास बिबट्याला यशस्वीरित्या बंद करण्यात आले.
चाकण एमआयडीसीतील मर्सिडीज बेन्झ कंपनीत पहाटेच्या सुमारास बिबट्या घुसल्याचे कंपनीच्या सुरक्षारक्षकाला आढळून आले. घटनेची माहिती मिळताच कंपनीतील कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. हा बिबट्या कंपनी आवारात कुठून आणि कसा आला हे अद्याप समजू शकलेले नाही. नर जातीचा अडीच वर्ष वयाचा हा बिबट्या आहे. या बिबट्याला आता पुन्हा दूर नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. बिबट्या पिंजऱ्यात कैद होताच कंपनीतील कामगार व वनविभागासह, पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.
नागरिकांवर हल्याची प्रकरणे
यापूर्वी जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, जुन्नर याभागात बिबट्या शेतात तर कधी कोंबड्याच्या खुराडयात , विहिरीत बिबट्या आढळून आला आहे. एवढं नव्हे तर पाळीव प्राण्यांना फस्त करण्याबरोबरच , लहानमुलांसह नागरिकांवरही हल्ले केले आहेत. याबरोबरच पुण्यातील कात्रज बोगद्या येथेही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. जिल्ह्यातील भौगोलिक वातावरण तसेच उसाच्या शेतीमुळे मागील काही वर्षात बिबट्याचा अधिवास वाढला आहे.