पुणे- भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांना 3000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
शिवसेना (Shivsena) शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सूरज लोखंडे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनी गवते यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज सकाळी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह इतर शिवसैनिक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांना अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
काय आहे प्रकरण ?
भाजप नेते किरीट सोमय्या हे शनिवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते. जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या पुणे महापालिकेच्या इमारतीमध्ये पोहोचले होते. नेमक्या त्याच वेळी पुण्यातील शिवसैनिक पुणे महापालिकेतील भ्रष्टाचारासंबधी निवेदन किरीट सोमय्यांना देण्यासाठी जमले होते. यावेळी मोठा गोंधळ झाला. त्या गोंधळात किरीट सोमय्या पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर पडले.त्यांच्या माकडहाडाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
झाल्याप्रकरणी किरीट सोमण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील तार केली आहे . तसेच ते राज्यपातांची भेट घेणार आहेत . गुन्हा दाखल झालेल्या अन्य शिवसैनिकांचा पोलिस शोध घेत होते . यामुळे शहर प्रमुख अनेक शिवसैनिक स्वताहून पोलिसांत हजर झाले आहेत . या सर्वांवर काय कारवाई होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे .
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी पुण्यातील घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकारकडे या प्रकरणाचा रिपोर्ट मागवणार असून येत्या काही दिवसात गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देखील तक्रार करणार असल्याची माहिती आहे.