गुन्हेगारांवर करडी नजर, भाविकांच्या रक्षणासाठी पुणे पोलीस सज्ज; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

294 0

पुण्यातील गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनातर्फे यंदा कोणकोणते निर्बंध घालण्यात आले आहेत. याबद्दलची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘गणेशोत्सवात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलीस सज्ज आहेत. यंदा मिरवणुकांमध्ये लावण्यात येणाऱ्या लेझर लाईट वर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून आधीच्या सणांमध्ये वापरलेले लेझर लाईट जप्त करण्यात आले आहेत. ट्रॅफिक कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असून वाहतुकीसाठी नवे नियम आणि निर्बंध लागू केले गेले आहेत. बहुतांश रस्त्यांवरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. महिला अत्याचार आणि चोरीच्या घटना टाळण्यासाठी मदत केंद्र उभारली जाणार आहेत. त्याचबरोबर उत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 7, 17, 18 सप्टेंबरला शहरात दारू दुकाने बंद राहणार आहेत. तसेच पुण्याचा मध्यवर्ती भाग असलेल्या आणि मुख्य मानाचे गणपती असल्यामुळे विश्रामबाग, फरासखाना, खडक पोलीस ठाणे भागातील दारू दुकाने 10 दिवस बंद ठेवण्यासाठी प्रस्ताव दिला आहे.’

याबरोबरच पोलीस आयुक्तांनी पुण्यातील गुन्हेगारीवर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, ‘वनराज आंदेकर हत्या प्रकरणात पोलीस कडक कारवाई करत आहेत. शहरात गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्यास पोलिसांची त्यावर नजर आहे. कायदेशीर तरतुदींनुसार सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल. गुन्हेगारीला नेस्तनाबूत करण्यासाठी नव्या योजना आखून ईट का जवाब पत्थर से द्यायला पोलीस दल सज्ज आहे. आंदेकर प्रकरणातील आरोपींशी संबंधित सगळ्यांना सह आरोपी करणार असून आंदेकर यांचा खून करणाऱ्या पूर्ण टोळीवर कारवाई करणार आहे. त्याचबरोबर प्रथमदर्शी आंदेकर खून कौटुंबिक वादातून झाल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात हल्ला करणाऱ्या अल्पवयीन आरोपींना सज्ञान ग्राह्य धरण्यासाठी अर्ज करणार आहे. यासह सोशल मीडियावर ॲक्टिव झालेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या काळात 756 गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर करडी नजर असणार आहे. तसेच 1752 सराईत गुन्हेगारांची यादी केली, पोलीस त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

सर्व गुन्हेगारांना जशाच तसे उत्तर दिले जाईल. गुन्हेगारी रोखण्यासाठी बेकायदेशीर हत्यारं आणि ड्रग्सविरोधी कारवाई करणार असून यावर्षी शहरातील 29 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्षरीत्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांविरुद्ध कडक पाऊले उचलण्यात येतील. त्याचबरोबर भविष्यात गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवून त्यांची घरे जमीन दोस्त केली जाणार आहेत.’

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विविध विषयांवरती चर्चा केली. मात्र यावेळी अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला प्रश्न म्हणजेच पॉर्शे अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी झाली होती का ? या प्रश्नावर पोलीस आयुक्तांनी प्रतिक्रिया देत सर्व प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी लोकांची चौकशी झाली आहे. असं म्हणत आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी झाल्याची कबुली पोलीस आयुक्तांनी दिली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!