पुणे विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार आणि इतर सुविधांच्या बांधकामासंदर्भात राजधानी नवी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयात उच्चस्तरीय तांत्रिक बैठक पार पडली. विस्तारिकरणासाठीचा OLS चा अहवाल सकारात्मक आला असून यामुळे काही तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा मार्ग मोकळा होणार आहे.
पुण्याहून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना चालना देण्यासाठी कोड ‘ई’ विमान चालवता यावीत, या दृष्टीने काही तांत्रिक बाबी पूर्ण करायच्या असून यासाठीच या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या विस्तारिकरणाच्या व्यवहार्यतेच्या पुनरावलोकनाबाबत असणारा ‘ऑबस्टॅकल लिमिटेशन सर्वेक्षण’ (OLS) विक्रमी वेगाने पूर्ण झाला आहे. तसेच या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सकारात्मक आढळून आल्याने पुणेकरांसाठी ही एक आनंदाची बाब आहे.
या बैठकीत राज्य सरकारकडून भूसंपादन, संरक्षण मंत्रालयाकडून जमिनीचे हस्तांतरण, एप्रन क्षेत्र, धावपट्टीची लांबी, नवीन टर्मिनल इमारत याचसोबत इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पाशी संबंधित इतर सर्वेक्षण करून संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्याशी सहकार्य आणि समन्वय ठेवण्याच्या सूचना भारतीय विमानतळ प्राधिकरणाला दिल्या.
बैठकीत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव वुम्लानमंग वुलनाम, संरक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव दीप्ती मोहिल चावला, विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षा, एम.सुरेश, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, ग्रुप कॅप्टन मनोज राणा, एअर मार्शल वाय.के. दीक्षित, पुणे विमानतळाचे संचालक श्री. संतोष ढोके आणि इतर अधिकारी उपस्थित होते.