पुण्यातील कोथरूड परिसरात गेल्या दहा दिवसात एका पाठोपाठ एक अशा तब्बल 52 डुकरांचा मृत्यू (PUNE PIG DEATH NEWS) झाल्याचं उघडकीस आलं आहे. ज्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. ही बाब स्थानिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पुणे महानगरपालिकेला कळवण्यात आलं होतं. त्यावरच आता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. ज्यामध्ये काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
पुण्यातील कोथरूड, भारतीनगर नाला, भिमाले कॉर्नर, कचरा रॅम्प या परिसरात सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या डुकरांचे एकापाठोपाठ एक मृत्यू होत आहेत. गेल्या दोन दिवसात तब्बल 15 डुक्कर दगावले आहेत. त्यामुळेच या डुकरांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला नसून त्यांच्यावर विष प्रयोग करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच याचा तपास करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने काही पथक तयार केली असून त्यांच्या मार्फत संपूर्ण तपास केला जात आहे. तर या प्रकरणाची दखल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने देखील घेतली असून विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्याचबरोबर या संशयास्पद घटनेचा कारण शोधण्यासाठी डुकरांचं पोस्टमार्टमही करण्यात आलं आहे. ज्याच्या रिपोर्ट मधून आता काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुक्या जनावरांना खरंच जाणून बुजून मारलं जात आहे की यामागे काही वेगळं कारण आहे, याची सविस्तर माहिती महानगरपालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली. डुकरांच्या शरीरात कार्बोनेट नावाचं केमिकल आढळून आलं आहे. हे केमिकल त्यांच्या शरीरात कसं गेलं याचा तपास सुरु आहे.