PUNE JAIN BORDING: पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील तीन एकरात स्थिरावलेलं शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग हाऊस.
तब्बल 65 वर्षांपासूनचा साक्षीदार म्हणून मी या जागेवर ऊन-वारा-पाऊस झेलत आलोय.
माझं नाव आहे… 1008 श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर!
मी, Jain Boarding मधील मंदिर बोलतोय..! मला ‘गहाण’ ठेवलंय म्हणे
आज मात्र मी या जागेत आहे की नाही, असा सवाल उपस्थित करून माझ्या अस्तित्वाविषयी बोललं जातंय…
आणि म्हणून मला बोलावं लागतंय…
बरोबर 67 वर्षांपूर्वी म्हणजे 1958 मध्ये हिराचंद नेमचंद दोषी नामक दानशूर सद्गृहस्थानं मुलांचं वसतिगृह आणि धर्मशाळेसाठी ही जागा दान दिली.
त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 1960 मध्ये माझा जन्म झाला.
JAIN BORDING LAND SALE SUSPENSION: पुण्यातील जैन बोर्डिंगच्या विक्रीला धर्मदाय आयुक्त यांची स्थगिती
साक्षात श्री भगवान महावीर माझ्या गाभाऱ्यात प्रतिष्ठापित झाले आणि त्यांच्या वास्तव्यामुळं ‘1008 श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर’
असं नामकरण करत माझं बारसं झालं. गेली 50-60 वर्षांमध्ये 10 हजारांहून अधिक गरजू विद्यार्थ्यांनी या वसतिगृहात राहून शिक्षण घेतलं,
माझ्या गाभाऱ्यात स्थिरावलेल्या भगवान महावीरांचं दर्शन घेतलं,
पूजा-अर्चा केली; पर्युषण पर्व पाळलं. माझ्या अंगाखांद्यावर खेळून लहानाची मोठी झाली आणि
भगवान महावीरांचा आशीर्वाद घेऊन आपापल्या आकाशात भरारी मारण्यासाठी पाखरासारखी उडूनही गेली.
PUNE JAIN BORDING: मी जैन बोर्डिंगमधलं मंदिर बोलतोय..!
माझे स्वामी जिनेंद्र आणि मी आम्ही दोघे मात्र आजही त्याच जागेत, त्याच ठिकाणी अचल आहोत.
पण आज… आज 65 वर्षांनंतर माझे स्वामी भगवान महावीर आणि मी आम्ही दोघे आहोत की नाही या प्रश्नाचं ‘मोहोळ’ थेट आमच्या अस्तित्वाभोवती उठलंय.
भगवान महावीर तर सकल विश्वाचा स्वामी; त्यांना इथून हलवण्याची कुणाची बिशाद लागून गेलीये?
KISAN SABHA PROTEST: सोयाबीन व कापूस खरेदी केंद्र सुरू करा;किसान सभेचे राज्यभर आंदोलन
पण माझं काय? मी बापडा दगड-विटांचा बनलेला, मायेचा आकार धारण केलेला एक सामान्य निर्जीव जीव!
आज माझ्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहिल्यानं माझ्या दगड-विटाही आता डळमळीत होऊ लागल्यात!
कुणी तरी येऊन आपल्याला जमीनदोस्त तर करणार नाही ना या भीतीनं त्यांना कंप सुटू लागलाय.
कारण काय तर जैन समाजाचं पवित्र स्थळ असलेल्या या जमिनीच्या विक्रीवरून आज नको तो वाद निर्माण झालाय!
या जैन बोर्डिंगची संपूर्ण तीन एकर जागा गहाण ठेवण्यात आलीये.
इतकंच नव्हे वैयक्तिक स्वार्थापोटी मलाही ‘गहाण’ ठेवण्यात आलंय म्हणे!
आता तर या जागेत माझं अस्तित्व आहे की नाही याची खातरजमा केली जाणार आहे.
माझ्या गाभाऱ्यात कोणत्या ईश्वराचं वास्तव्य आहे हे देखील पाहिलं जाणार आहे.
या जगात देव आहे की नाही, या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात पिढ्यानपिढ्या घालवलेला हा मानव प्राणी,
ज्यानं माझी निर्मिती करून माझ्या गाभाऱ्यात भगवान महावीरांची मूर्ती प्रतिष्ठापित केली
तोच हा मानव प्राणी आज क्षणिक लोभापायी मला गहाण ठेवू शकतो,
NILESH GHAYWAL PASSPORT: कुख्यात गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द
माझा अंतरात्मा बनून गेली 65 वर्षे मला सांभाळणाऱ्या परमेश्वराचं अस्तित्वच नाकारू शकतो हे ऐकून माझं मन व्यथित झालंय.
असो, परमेश्वरापुढं माझं अस्तित्व ते काय? तो निर्गुण, निराकार आणि मी सगुण, साकार! मी एक मातीचा गोळा; आज-उद्या मातीतच जाणार!
तुम्ही या जागेवरून माझं अस्तित्व मिटवू शकाल पण
त्या परमेश्वराला हलवू शकणार नाही. कारण जळी, स्थळी,
काष्ठी, पाषाणी सर्वत्र तोच तो भरून उरलाय. कदाचित या जागी मी
उद्या असेन किंवा नसेन पण चराचरात आणि
कणाकणात भरून उरलेले श्री भगवान महावीर मात्र सदा सर्वदा असणार हे निश्चित!
तुम्हाला सुबुद्धी लाभो,
ईश्वर तुमचं कल्याण करो हीच श्री भगवान महावीर चरणी प्रार्थना! जय जिनेंद्र !!
संदीप चव्हाण, वृत्तसंपादक
Top News मराठी,