पुणेब्रेकिंग न्यूज

पुणेकरांसाठी खुशखबर! एका दिवसाच्या पावसात एक महिना पुरेल इतका पाणीसाठा; वाचा कोणत्या धरणात किती पाणी ?

जून महिन्यात पुण्यात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे जुलै महिन्यात पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र जुलै महिन्यात सातत्याने झालेल्या पावसामुळे पुणेकरांवरचे पाणी कपातीचे संकट टळणार असल्याची शक्यता आहे. त्यातच आनंदाची बाब म्हणजे पुण्यात केवळ 24 तासात झालेल्या पावसाने पुणेकरांच्या महिन्याभराच्या पाण्याची चिंता मिटवली आहे.

शनिवार आणि रविवारी पुण्यातील धरण क्षेत्रात धो धो पाऊस झाला. ज्यामुळे खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील सर्वच धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मागच्या महिन्यात पुणेकरांना केवळ एक महिना पुरे इतकाच पाणीसाठा उपलब्ध होता. त्यातही पुण्यात वारीचे प्रस्थान झाल्यानंतर दोन दिवसात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वापरला गेला. ज्यामुळे पुणेकरांचा पाणी प्रश्न आणखी बिकट होण्याची चिन्ह दिसत होती. मात्र आता अखेर पुढच्या एक ते सव्वा महिन्यासाठी पुणेकरांचा पाणी प्रश्न सुटला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खडकवासला धरणात सध्या 53.12 टक्के, वरसगाव धरणात 25.81 टक्के, पानशेत धरणात 39.78 टक्के तर टेमघर मध्ये 22.77 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. ज्यामुळे पुणेकरांच्या एक महिन्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.