ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्या, खासदार गिरीश बापट यांची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे मागणी

488 0

पुणे- ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्यावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली आहे. अनुराग ठाकूर हे काल पुणे दौऱ्यावर आले होते.

खासदार बापट म्हणाले की, महाराष्ट्र राज्यामध्ये ढोल-ताशा खेळाला आगळे महत्त्व आहे. जसा पंजाबचा भांगडा, गुजरातचा गरबा, तसा महाराष्ट्राचा ढोल-ताशा कोणताही उत्सव असो वा देवकार्य, मंगलकार्य वा मिरवणूक त्यासमोर ढोल-ताशांचे वादन हे अपरिहार्यच अगदी कुस्तीच्या मैदानात देखील पैलवान मंडळींमध्ये जोश निर्माण करण्यासाठी हलगीचे वादन केले जाते. पुरातन काळापासून ढोल-ताशा हे रणवाद्य तसेच मंगलवाद्य म्हणून अनेक ठिकाणी त्याचे वादन केले जाते.

सैन्यांमध्ये जोश आणि उत्साह निर्माण करण्याची ताकद या वाद्यांमध्ये आहे. तसेच स्थानिक उत्सवामध्ये देवादिकांच्या मिरवणुकांमध्ये मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी ढोल-ताशाचे वादन केले जाते. ढोल-ताशा या वाद्यांना पुरातन संदर्भ आहेत. ढोल, ताशा, शिंग, दुंदुभी वाद्य ऐतिहासिक कालापासून वापरात आहेत. याचा शोध घ्यायचा झाल्यास नेमका निर्मितीचा काळ निश्चित करता येत नाही.

2019 साली अमेरिकेमध्ये डल्लास येथे BMM Convocation ढोल ताशा खेळांची स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये सुमारे ६ संघातील १०० वादकांनी सहभाग घेतला होता. त्याचे परीक्षण पुण्यातून ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रातर्फे करण्यात आले होते. आता या ढोल ताशा खेळाची व्याप्ती केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नसून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या ठिकाणी देखील लोकप्रिय होत आहे. पुण्यनगरीत सुमारे २०० ढोल-ताशांचे संघ असून सुमारे 25००० वादक आपली वादन कला याद्वारे लोकांपुढे सादर करतात. नाशिक, मुंबई, ठाणे, अमरावती, नागपूर, कोल्हापूर येथील ढोल-ताशा खेळ विशेष प्रसिद्ध आहे.

ढोल-ताशां खेळाला अद्यापि खेळ म्हणून राज मान्यता मिळाली नाही ही सर्व वादकांची खंत आहे. हे संपूर्ण चराचरात मंगलमांगल्य निर्माण करण्याचे काम ही ढोल-ताशा खेळाची वादक मंडळी आपल्या वादनातून करत असतात. अनेक समारंभात जान निर्माण करण्याची ताकद या खेळामध्ये आहे. यामुळे महाराष्ट्रातील लोकप्रिय अशा लोक संगीताशी संबंधित ढोल-ताशा या खेळास खेळ म्हणून सरकार दरबारी मान्यता मिळावी, अशी विनंती खासदार बापट यांनी केली.

 

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide