भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
पुणे- गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानक असे करावे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच यासंदर्भात मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र ही दिले असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेस आ. पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस तथा मनपा निवडणूक प्रचार प्रमुख राजेश पांडे, सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे, दीपक पोटे, भाजपा शिवाजी नगर मंडल अध्यक्ष रवी साळेगावकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर यांच्यासह नगरसेविका ज्योत्स्नाताई एकबोटे, अल्पनाताई वर्पे,श्रद्धाताई प्रभुणे,वासंतीताई जाधव, नगरसेवक जयंत भावे, राजाभाऊ बराटे, सुशिल मेंगडे पदाधिकारी अनिता तलाठी, हर्षदाताई फरांदे,पल्लवीताई गाडगीळ, विद्या टेमकर, कुलदीप सावळेकर, नवनाथ जाधव, स्वप्निल राजीवडे, रणजित हगवणे, प्रकाश तात्या बालवडकर, सतीश मोहोळ, अमोल डांगे, शिवाजी शेळके, गायत्री लांडे, महेश पवळे, दीपक पवार, अतुल चाकणकर, वैभव मुरकुटे, श्रद्धा मराठे, यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचं सर्वांचं श्रद्धास्थान आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी पुण्यात याच ठिकाणी विदेशी कपड्यांची होळी करुन, ब्रिटिश सरकारला आव्हान दिले होते. त्यामुळे या परिसराचे आम्हा सर्वांसाठी वेगळे महत्त्व आहे. येत्या ६ मार्च रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुण्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यासाठी दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानक येथे मेट्रोने प्रवासही करणार आहेत. त्यामुळे या मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर करावे, यासाठी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या कडे पत्राद्वारे मागणी केली आहे”