PMC ELECTION| GANESH BIDKAR: महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. दुसरीकडे संभाव्य उमेदवारांकडून प्रचाराचा धडका सुरू आहे. पुणे महानगरपालिकेचे भाजपा निवडणुक प्रमुख गणेश बिडकर हे प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल प्रभागातून लढणार आहेत. बिडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे अविरतपणे काम सुरू असताना, दुसरीकडे गेल्या नऊ महिन्यांमध्ये जवळपास 60 हजारांच्यावर नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेत बिडकर यांनी संवाद साधला आहे.
गेल्या नऊ महिन्यांपासून बिडकर यांनी राबवलेले ‘नागरिक जनसंपर्क अभियान’ हे केवळ प्रचारापुरते मर्यादित न राहता, थेट जनतेच्या प्रश्नांशी जोडले गेले आहे. या कालावधीत त्यांनी ६० हजारांहून अधिक नागरिकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधत, प्रभागातील समस्या, अपेक्षा आणि नागरिकांच्या सूचना जाणून घेतला आहे.
दररोज किमान ६० ते ७० घरे आणि २५० ते ३५० नागरिकांना भेटण्याचा शिस्तबद्ध कार्यक्रम राबवण्यात येत असून, या अभियानात पत्नी गौरी बिडकर आणि कन्या पूर्वा यांचाही सक्रीय सहभाग आहे. त्यामुळे हा जनसंपर्क केवळ राजकीय न राहता, विश्वास आणि आपुलकीचा संवाद ठरत असल्याचे चित्र आहे.
प्रभागातील पाणी, आरोग्य, रस्ते, स्वच्छता, प्रशासकीय अडचणी अशा मूलभूत प्रश्नांवर नागरिकांशी थेट चर्चा करून, त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जात आहे. त्यामुळे बिडकर यांची “निवडणुकीच्या वेळी दिसणारे उमेदवार” नव्हे, तर सातत्याने नागरिकांमध्ये राहणारे लोकप्रतिनिधी अशी ओळख आणखीन अधोरेखित झाली आहे.
याबद्दल बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “नागरिकांना भेटतो, तेव्हा त्यांच्याकडून मला माझ्या कामाचा थेट फीडबॅक मिळतो. तो माझ्यासाठी सगळ्यात मूल्यवान असतो. नागरिक आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये पारदर्शकता हवी, असे मी मानतो. त्यामुळे आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना भेटलो आहे, त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रिया ऐकून आपले काम नागरिकांपर्यंत पोहोचलेले आहे, याचे समाधान आहे”.