पुणे: पुण्यातील ८० बाल कलाकारांचा चमू येत्या रविवारी (२५ ऑगस्ट) अयोध्या स्थित राम मंदिरामध्ये स्व. ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके रचित गीतरामायण सादर करणार आहेत. पुणे येथील प्राजक्ता जहागीरदार यांच्या स्वरतरंग संगीत अकादमीच्यातर्फे वतीने हा कार्यक्रम होतो आहे.
पुण्यातील “स्वरतरंग संगीत अकादमी”तर्फे बाल कलाकारांच्या गटासह व अयोध्या स्थित राममंदिरात होणारा हा गीतरामायणाचा पहिला कार्यक्रम असून तो कार्यक्रम सादर करण्याचा मान पुण्यातील स्वरतरंग अकादमी व बाल कलाकारांना मिळाला आहे.
या कार्यक्रमासाठी पुण्याचे खासदार व केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ कीर्तनकार चारूदत्त आफळे, ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे – चापेकर, गायक आनंद माडगुळकर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायक महेश काळे, अभिनेता योगेश सोमण, प्रसाद ओक आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पुण्यातील बाल कलाकार स्वर स्वरतरंग संगीत अकादमीच्या माध्यमातून असा अनोखा व अभिनंदनीय कार्यक्रम होतो आहे, ही पुणे व महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असे शुभेच्छांमध्ये त्यांनी म्हटले आहे.
शास्त्रीय संगीताचे धडे देणाऱ्या “स्वरतरंग संगीत अकादमी”तर्फे याआधी गीत रामायण, बालमुखातून स्वातंत्र्यवीर सावरकर अशा विविध विषयावरील सामुहिक गीत सादरीकरणाचे यशस्वी आयोजन केलेले आहे.