माझा पत्ता : पुणे महापालिका प्रवेशद्वार/वरून पाचवी पायरी
माझा अल्प परिचय : रोज-दररोज माझ्या अंगावरून शेकडो जण पालिकेत ये-जा करत असतात. सर्वसामान्यांपासून ते अगदी कितीतरी थोरा-मोठ्यांचे पाय मला लागले असतील… पण काही दिवसांपासून मी अशी काय चर्चेत आलीये की, मी थेट ‘वरची पायरी’ गाठलीये, माझी ‘उंची’ वाढलीये..! 5 फेब्रुवारी 2022 रोजी जे कुणी नेते माझ्या अंगावर पडले तेच नेते 11 फेब्रुवारीला माझ्या अंगावर उभे राहिले आणि त्यांनी हार-तुरेही स्वीकारले. चला, हे माझं पायरी पुराण आज मीच तुम्हाला सांगते…
पायरीवरचा प्रसंग 1 ला
5 फेब्रुवारीच्या दुपारी कुणी एक नेते पुणे महापालिकेत आले होते म्हणे ! त्यादिवशी सुटी होती त्यामुळं पालिकेत नेहमीच्या मानानं वर्दळ कमी होती. तितक्यात, पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळून जोरजोरात चपला-बुटांचा आवाज येऊ लागला आणि माझ्या दिशेनं काही पावलं झपाझप पुढं सरकू लागली. मी बिचारी जीव मुठीत घेऊन बसली. काही कळायच्या आत एकच गडबड-गोंधळ सुरू झाला… तिकडं पावलांची गती वाढली आणि इकडं माझी धडधड वाढली. तितक्यात, ‘धडाम…’ असा जोराचा आवाज झाला. पाहाते तो काय, माझ्या अंगावर कुणी तरी पडलं होतं. त्यांचं विव्हळणं पाहून मी देखील विव्हळली. मग मात्र कुणी तरी त्यांना हाताला धरून उठवलं आणि गाडीत घालून हॉस्पिटलला नेलं… पुढं काय झालं हे मला नाही सांगता यायचं. कारण मी तर बिचारी पायरी; वर्षानुवर्षे एकाच जागी अडून बसलेली…
पायरीवरचा प्रसंग 2 रा
5 फेब्रुवारी 2022 रोजी माझ्याबाबतीत घडलेला प्रसंग मी विसरले नाही तोच दुसरा प्रसंग घडला. 11 फेब्रुवारी हा पालिकेचा कामाचा दिवस होता त्यामुळं हू म्हणून गर्दी… पण आजची गर्दी काहीशी वेगळी होती. बघता बघता सारा परिसर या गर्दीनं व्यापून गेला. काही जण तर माझ्या अंगाखांद्यावर बराच वेळ बसून कुणाची तरी वाट पाहात बसले होते. तितक्यात, त्यादिवशी जे कुणी नेते पडले तेच माझ्या अंगाखांद्यावर येऊन उभे राहिल्याचे मला दिसले आणि मी ज्यांच्यासाठी विव्हळले होते त्यांना सुखरूप पाहून मला हायसे वाटले. त्या नेत्याचा हार-तुरे देऊन सत्कारही झाला. माझ्या अंगावर कुणी तरी पडलं, धडपडलं याचं दुःख तर झालं होतंच पण त्या पडलेल्या व्यक्तीचा माझ्याच अंगाखांद्यावर सत्कार झाला हे पाहून आनंदही झाला.
पायरीवरचा प्रसंग 3 रा
सत्काराचा कार्यक्रम आटोपला. बराच वेळ माझ्या अंगाखांद्यावर बसलेले, उभे असलेले नेते, कार्यकर्ते निघून गेले आणि मी पुन्हा एकटी पडले तोच माझ्या अंगावर कुणीतरी गोमूत्र शिंपडलं आणि मला धूवूनही काढलं. कदाचित, मी अनुभवलेलं दुःख आणि त्यानंतर उपभोगलेला आनंद या भावना माझ्या मनात घर करून राहू नयेत, पायरीनं ‘पायरी’ सोडू नये, मी माझी ‘पायरी’ धरून राहावं या हेतूपोटी माझी शुद्धता केली गेली असावी.
असो, या सगळ्या प्रसंगांत मी मात्र चर्चेत आले हेही नसे थोडके ! अर्थात, माझ्या पायरीवरून कोण पडलं, कोण उभं राहिलं याच्याशी माझा संबंध तो काय ? भले ही मी मोठ्या तोऱ्यात यापूर्वी म्हणून गेली असेन की, काही दिवसांपासून मी थेट ‘वरची पायरी’ गाठलीये, माझी ‘उंची’ वाढलीये तर ते केवळ म्हणण्यापुरतं बरं का ! कारण भविष्यात वर्षानुवर्षे पुणे महापालिकेची पायरी बनून राहाणं आणि ये-जा करणाऱ्यांच्या पावलांना आधार देणं हीच माझी ‘पायरी’… इति श्री पायरी पुराणं महिमा सफल संपूर्णम् …!
– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी