संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ रामचंद्र देखणे यांचं निधन
पुणे: संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचं आज त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते 67 वर्षांचे होते त्यांच्या पश्चात मुलगी सून आणि नातवंड असा परिवार आहे.
रामचंद्र देखणे यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वडिलांच्या कीर्तनात ते लहानपणी अजाणतेपणी टाळकरी म्हणून उभे रहात आणि खड्या आवाजात अभंगातली चरणे म्हणत. त्यामुळे कीर्तन, प्रवचन, भजन आणि भारूड या कला प्रकारांशी ते आपोआप जोडले गेले. गावच्या जत्रेत किंवा पालखी, दिंडी सोहळ्यात रामचंद्र देखणे वेगवेगळी सोंगे आणून भारुडे करू लागले.
देखणे यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी होते. ३४ वर्षांच्या नोकरीनंतर ते ३०-४-२०१४ रोजी निवृत्त झाले.
२३-२४ ऑक्टोबर २००४ या दरम्यान राळेगण सिद्धी येथे झालेल्या ग्रामजागर साहित्य संंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
सांस्कृतिक कार्यक्रमात मोलाचे योगदानकिर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ११ ऑगस्ट २०१३ रोजी झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे २२-२३ जानेवारी २०११ या तारखांना जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथे झालेल्या १२व्या “राष्ट्रीय बंधुता साहित्य संमलना’चे अध्यक्षपद भूषविले. अमेरिकेत झालेल्या विश्व साहित्य संमेलनातील “संतसाहित्य आणि आधुनिकता’ या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र देखणे होते. सासवडच्या मराठी साहित्य संमेलनप्रसंगी (जानेवारी २०१४) ‘प्रश्न आजचे उत्तरे संतांची’ या विषयावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदी रामचंद्र देखणे होते. कडोली साहित्य संघाच्या माचीगड येथे २७-१२-२०१०ला झालेल्या १३व्या कडोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. संमेलनपूर्व संमेलनात रामचंद्र देखणे यांचा “साहित्यातील लोकरंग’ हा कार्यक्रम झाला होता.
