कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभास अभिवादनाकरिता येणाऱ्या अनुयायांसाठी प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षीही योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले.
यावेळी बार्टीचे महासंचालक श्री. सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप गिल्ल, पोलीस सह आयुक्त सोमय मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, पीएमपीएल, आरोग्य विभाग, पंचायत राज संस्था आणि अग्निशमन दलाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, विजयस्तंभ परिसरातील कामांना प्राथमिकता देत विजयस्तंभाची डागडुजी व दुरुस्ती, परिसरातील फुलांची सजावट, प्रकाशयोजना, स्वच्छता आणि परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगितले. वाढत्या वाहन वाहतुकीमुळे कोंडी होऊ नये यासाठी मोठ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग झोन, छोटे वाहन व दोनचाकींसाठी स्वतंत्र जागा, आवश्यक असल्यास तात्पुरत्या पार्किंगची वाढीव व्यवस्था, प्रवेश-निर्गमन मार्गांची वेगळी आखणी आणि वाहतूक वळविण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देशही देण्यात आले.
ते पुढे म्हणाले, विजय स्तंभ परिसरात स्वच्छता करण्यासाठी परिसरातील ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांची सेवा देणे. पायी येणाऱ्या अनुयायांसाठी सुरक्षित पथ, सावली, पाण्याची ठिकाणे आणि विश्रांती सुविधा उपलब्ध करण्यास सांगण्यात आले असून महिला अनुयायांसाठी स्वतंत्र मार्ग, हिरकणी कक्ष आणि स्वच्छता सुविधा उभारण्यात याव्यात असेही निर्देश देण्यात आले. कार्यक्रमादिवशी लाखोंची वर्दळ होत असल्याने शौचालयांची संख्या वाढवून मोबाइल टॉयलेट युनिट कार्यरत ठेवणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि पाण्याचे पॉईंट स्थळाभोवती उपलब्ध ठेवणे, कचरा व्यवस्थापनासाठी विशेष पथके, कंटेनर, डम्पर आणि नियमित संकलन व्यवस्था सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आरोग्य विभागाला प्राथमिक उपचार केंद्र, डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफसह आवश्यक औषधे, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा सतत कार्यरत ठेवण्यास सांगण्यात आले.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विस्तृत पोलीस बंदोबस्त, राज्य राखीव पोलीस दलाची मदत, संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, 24×7 नियंत्रण कक्ष, वायरलेस यंत्रणा, आपत्कालीन पथके, फायर ब्रिगेड, तसेच जनसमुदायावर ड्रोनद्वारे देखरेख या बाबींसाठी संबंधित विभागांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. अनुयायांच्या सुविधा वाढवण्यासाठी बार्टीतर्फे बुक स्टॉल, माहिती केंद्र आणि मार्गदर्शनासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्याबाबतही बैठकीत निर्णय घेण्यात आला.
विजयस्तंभ अभिवादनाकरिता येणाऱ्या अनुयायांकरिता हा ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्वाचा कार्यक्रम असल्याने सर्व विभागांनी स्वतःच्या पातळीवरील तयारीला गती देत परस्पर समन्वयाने काम करून अनुयायांना सुरक्षित, सुरळीत आणि सन्मानपूर्वक वातावरण उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.