मुंबई : तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तयार केलेल्या अहवालात स्वतःला क्लिनचीट देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या अहवालाला कोणतेही महत्त्व नाही, असे वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे. त्यामुळे दीनानाथ रुग्णालयाभोवतीचा कारवाईचा फास अधिक आवळला जाण्याची शक्यता आहे.
चाकणकर म्हणाल्या की, पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर चौकशी केली जाईल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सादर केलेल्या चौकशी अहवालाला फारसे महत्त्व व गांभीर्य नाही. कारण, हा स्वतःलाच क्लिनचीट देण्याचा प्रकार आहे. याप्रकरणी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती सोमवारी सकाळी पुणे पोलिस आयुक्तांना आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालातील माहितीनुसार पुढील कारवाई केली जाईल.
रुग्णालयाच्या अहवालात काय?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समितीनुसार, तनिषा भिसे 2020 पासून उपचार घेत होत्या. त् 2022 मध्ये त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती. त्यात त्यांना खर्चाच्या 50 टक्के रकमेची सूट देण्यात आली होती. गर्भधारणेत मोठी जोखीम असल्याने प्रसूती सुखरूप होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे रुग्णालयाने त्यांना मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता.
या महिलेच्या जुळ्या मुलांची प्रसूती धोकादायक होती. त्याची कल्पना त्यांना देण्यात आली होती. विशेषतः जुळी मुले असूनही महिला तब्बल 6 महिने तपासणीसाठी आली नव्हती. आगाऊ रक्कम मागितल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे.