उद्योगक्षेत्रात सेन्सर टेक्नॉलॉजी म्हणजेच संवेदना असणाऱ्या यंत्रसामग्रीचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होत असून यासाठीच केंद्र सरकारच्या समर्थ उद्योग भारत अंतर्गत विविध कंपन्यांच्या सेन्सर टेक्नॉलॉजी उपकरणांचे प्रदर्शन उद्या (४ मार्च) भरविण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात केंद्र सरकारच्या समर्थ उद्योग भारत या उपक्रमाच्या माध्यमातून लघू व मध्यम स्वरूपातील उद्योगांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी ‘इंडस्ट्री ४.०’ म्हणजेच सीफोरआयफोर प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून विविध कंपन्यांच्या मदतीने हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यासाठी ऑटोमेशन इंडस्ट्री असोसिएशन यांच्यासोबत या प्रदर्शनाचे आयोजन केले असून यात भारतभरातील नऊ विविध कंपन्या आपल्या उत्पादनाचे प्रदर्शन मांडणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाऊंडेशन’ या इमारतीत असणाऱ्या ‘सीफोरआयफोर’ या प्रयोगशाळेत हे प्रदर्शन सकाळी ११ वाजल्यापासून सर्वांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
या प्रदर्शनात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, या क्षेत्रात काम करू इच्छिणारे विद्यार्थी तसेच नामांकित व्यक्ती सहभागी होणार आहे.
—-