बारामतीतील वाढती गुन्हेगारी ही पोलिसांसह आता उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी देखील डोकेदुखी ठरत आहे. बारामतीत (baramati) हॉटेल चालकाला बेदम मारहाण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ काल व्हायरल झाला. हे सीसीटीव्ही पाहून आता अजित पवार (Ajit pawar) देखील संतापलेले पाहायला मिळाले. अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना सोडणार नाही असा सज्जड दमही त्यांनी भरला आहे.
शुक्रवारीही सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बारामतीतील मेडिकल कॉलेजजवळील एका हॉटेलमध्ये तीन मुले दुचाकीवरून आली. या तिघांनी काउंटरवर बसलेल्या मालकाशी बोलत बोलत वाद घातले. त्यानंतर हॉटेल मालकाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यातील एकाने बेल्टनेही मारहाण केल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर बारामती पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत सीसीटीव्हीच्या मदतीने तिन्ही गुंडांना ताब्यात घेतलं. दरम्यान या गुंडांनी हॉटेल मालकाला मारहाण का केली याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र याच घटनेवर आता अजित पवारांनीही संताप व्यक्त केला आहे. तर खासदार सुनेत्रा पवार यांनीही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी संपर्क साधत गुन्हेगारांना कठोर शासन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी बोलत असताना त्यांनी बारामतीतील गुन्हेगारीवर आहे भाष्य केलं. कुणी कितीही जवळचा असला तरीही मी त्यांना सोडणार नाही. सतत गुन्हे केले तर मकोका लावला जाईल, या शब्दात अजित पवारांनी गुन्हेगारांना दम दिला. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातही गुन्ह्यांची संख्या वाढताना दिसते. बारामतीतही तीन ते चार मारहाणीच्या घटना घडल्या असून त्याचे सीसीटीव्ही देखील व्हायरल होत असल्यामुळे या गुन्हेगारांवर तातडीने वचक घालण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.