पूजा मोरे(POOJA MORE) हे नाव सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. भाजपकडून(BJP) प्रभाग क्रमांक 2 मधून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी अचानक उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पूजा मोरे यांचा राजकीय प्रवास जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
पूजा मोरे(POOJA MORE)या बीड (BEED)जिल्ह्यातील गेवराई (GEORAI) तालुक्यातील रहिवासी आहेत , 2013–14 पासून त्या सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये सक्रिय असून शेतकरी प्रश्न, आंदोलन आणि आरक्षणाच्या लढ्यात त्यांनी सहभाग घेतला आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करताना शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला.
2017 मध्ये अवघ्या 21व्या वर्षी त्या गेवराई(GEORAI) पंचायत समितीच्या सदस्या म्हणून निवडून आल्या. राज्यातील सर्वात कमी वयाच्या पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून सक्रिय राजकारणाला सुरुवात केली.
मराठा आरक्षण चळवळीत सहभाग आणि प्रभावी वक्तृत्व शैलीमुळे त्या राज्य पातळीवर ओळखल्या जाऊ लागल्या. याच पार्श्वभूमीवर 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी त्यांची स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली होती.
पूजा मोरे(POOJA MORE)यांनी धनंजय जाधव यांच्यासोबत विवाह केल्यानंतर त्या पूजा धनंजय जाधव (POOJA JADHAV) म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. विवाहानंतर त्यांच्या सामाजिक-राजकीय भूमिकेत बदल झाल्याचं पाहायला मिळालं असून त्या हिंदुत्ववादी विचारधारेशी अधिक जवळीक साधताना दिसल्या.
महानगरपालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये(BJP) प्रवेश केला आणि प्रभाग क्रमांक 2 मधून त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र सोशल मीडियावरील वाद, जुने व्हिडिओ व्हायरल होणे आणि त्यातून झालेल्या टीकेनंतर त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला.
संघर्षातून पुढे आलेली तरुण नेत्या, कमी वयात लोकप्रतिनिधी झालेली आणि विविध राजकीय टप्प्यांतून गेलेली व्यक्ती म्हणून पूजा धनंजय जाधव यांचा प्रवास सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.