DAGDUSHETH GANPATI TEMPLE PHUKET THAILAND : पुण्याचं आराध्य दैवत असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहेत. यामध्ये अनेक परदेशी नागरिकही बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत. मात्र दगडूशेठ गणपतीची ख्याती भारतापुरती मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरही बाप्पाचे भक्त आहेत. यातीलच (DAGDUSHETH GANPATI TEMPLE PHUKET THAILAND)एका महिला भक्ताने पुण्यातल्या दगडूशेठ गणपती मंदिरासारखं मंदिर आणि बाप्पाची हुबेहूब मूर्ती थायलंडच्या फुकेतमध्ये स्थापन केली आहे. विशेष म्हणजे फुकेतमधल्या या दगडूशेठ गणपती मंदिरात यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव ही साजरा होतोय. पाहूया दगडूशेठ बाप्पाच्या निस्सीम महिला भक्ताची आणि थायलंडच्या गणेशोत्सवाची स्पेशल स्टोरी…
फुकेतमधील समुद्रकिनाऱ्यावरील ही दगडूशेठ मंदिराची प्रतिकृती मिस पापचसॉर्न मिपा यांनी बसवली आहे. मिस मिपा या थायलंड मधील बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजिका आहेत. मिस मिपा यांचं आणि दगडूशेठ बाप्पाचं वीस वर्षांपासूनचं नातं आहे. पुण्यातील दगडूशेठ बाप्पाचे भक्त चेतन लोढा यांनी 2005 मध्ये त्यांना पहिल्यांदा बाप्पाच्या दर्शनासाठी आणलं. त्यावेळी त्या भारावून गेल्या. देश, धर्म, भाषा वेगळी असली तरी पहिल्याच दर्शनात त्यांना बाप्पाच्या अलौकिक श्रद्धेची जाणीव झाली. तेव्हापासून त्या दर महिन्याला पुण्यात बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. मात्र जसं आपण बाप्पाच्या दर्शनाला येतो तसं आता बाप्पालाच आपल्या सोबत घेऊन जाऊया, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडे ही इच्छा बोलून दाखवली. आणि मिस मिपा यांची श्रद्धा पाहून विश्वस्तांनी मंदिर बांधण्यासाठी परवानगी दिली. 2022 मध्ये सुरू झालेलं मंदिराचं काम 2024 मध्ये पूर्ण झालं. त्यानंतर दगडूशेठ गणपतीसारखी हुबेहूब मूर्ती पुण्याहून फुकेतला नेण्याचं ठरलं. त्यानुसार बाप्पाची 700 किलो वजनाची मूर्ती जहाजाने 40 दिवसांच्या प्रवासानंतर फुकेतला पोहोचली. ही मूर्ती पोहोचवण्याचं काम अतिशय जीकीरीचं होतं. मात्र कोणतही विघ्न न येता ही मूर्ती जशी होती त्याच स्थितीत फुकेतला पोहोचली. त्यासह 90 किलोची पंचधातूची मूर्तीही बनवून घेण्यात आली. त्यानंतर शास्त्रानुसार बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्यातील प्रसिद्ध नादब्रह्म ढोल ताशा पथकाने बाप्पाच्या सेवेत वादन केलं. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेल्या शंतनू भानुसे गुरुजींनीच या बाप्पाचीही प्रतिष्ठापना केली. पुणे शहरातून तीन पुजारी आणि दोन सेवक यांची बाप्पाच्या सेवेत कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून मंदिरात चार वेळा पूजा-आरती केली जाते. थायलंड मधील नागरिक या मंदिराला मोठ्या संख्येनं आणि आवर्जून भेट देतात. मात्र यंदा पहिल्यांदाच या दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यासाठी पुण्यातील दगडूशेठ मंदिराच्या विश्वस्तांच्या हस्ते बाप्पाची छोटी मूर्ती थायलंडला पाठवण्यात आली. काल ढोल ताशाच्या गजरात या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली असून पुण्यात साजरा होतो त्याच पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे.
AZAD MAIDAN : मराठ्यांचं वादळ आझाद मैदानावर धडकणार, आझाद मैदानाचा नेमका इतिहास काय?
थायलंडच्या या पहिल्याच गणेशोत्सवाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मिस मिपा यांच्या गणेश भक्तीचं कौतुकही होतय. तर थायलंड मधील या गणपती बाप्पाचं पाच दिवसांनी विसर्जन होणार आहे. फुकेत येथील समुद्रात पहिल्यांदाच गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जित केली जाणार आहे. आणि यंदाच्या वर्षीपासून दरवर्षी थायलंडमध्येही गणेशोत्सव साजरा होणार आहे.