पुणे- एका नऊ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करीत अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. ही घटना २०१९ मध्ये येरवडा भागात घडली होती.
भूषण राज दुरेकल्लू (वय ३१) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी दुरेकल्लू विरोधात भारतीय दंडविधान कलाम ३७७, ३५४, ३५४ अ आणि बाललैंगिक अत्याचार कायदा कलम ३, ४, ७, ८ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी कामकाज पाहिले. त्यांनी ५ फिर्यादी आणि १ बचाव पक्षाचा साक्षीदार तपासला. यामध्ये पीडितेची साक्ष महत्वाची ठरली. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम यांनी या प्रकरणाचा तपास केला.
काय आहे घटना ?
फिर्यादीच्या पतीचे निधन झाले असून त्या सासू, मुलगा आणि मुलीसोबत राहतात. ३ एप्रिल २०१९ रोजी त्या कामावर गेल्या होत्या. यावेळी पीडित मुलगी मैत्रिणीबरोबर खेळत होती. त्यावेळी भूषण याने पीडितेच्या विनयभंग केला. त्यानंतर उन्हाळ्याच्या सुटी दरम्यान एकेदिवशी घराशेजारील एक इमारतीमध्ये पीडितेला नेऊन तिच्यावर अनैसर्गिग अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.