कामावरून काढल्याने मालकिणीला जाळले, महिलेसहित आरोपीचाही भाजून मृत्यू

620 0

पुणे- कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एका कामगाराने मालकिणीला पेट्रोल ओतून जाळून टाकले. ही घटना वडगावशेरी येथे सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत मालकिणीसह त्या कामगाराचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आगीत लेडीज टेलरिंगचे दुकान चालविणाऱ्या बाला नोया जोर्निंग (वय ३२, रा. वडगाव शेरी, मूळ रा. ओडिशा) या महिलेचे आणि पेट्रोल टाकून जाळणारा आरोपी मिलिंद नाथसागर (वय ३५, रा. वडगाव शेरी) या दोघांचा मृत्यू झाला आहे. प्रशांतकुमार देबनार हा मदतीसाठी आलेला तरुण आगीत भाजला. चंदननगर पोलिसांनी महिलेचा जाळून खून केल्याप्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

वडगाव शेरीतील रामचंद्र सभागृहाशेजारी बाला जोर्निंग या ‘ए टू झेड’ हे लेडीज टेलरिंगचे दुकान भाड्याने चालवितात. दोन वर्षांपासून त्यांच्याकडे आरोपी मिलिंद नाथसागर दुकानात कामाला होता. आरोपी व्यवस्थित काम करीत नसल्याने जोर्निंग यांनी आठ दिवसांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकले होते. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास महिला दुकानाचे अर्धे शटर बंद करून टेलरिंगचे काम करीत असताना आरोपी पेट्रोलने भरलेले कॅन घेऊन दुकानात शिरला. ‘मला कामावरून काढून टाकले, आता तुला जिवंत सोडणार नाही,’ असे धमकावून महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकले. या दरम्यान दोघांमध्ये झटापट झाल्याने आरोपीच्या अंगावरही पेट्रोल उडाले. आरोपीने लायटरने महिलेला पेटवले. दुकानात पेट्रोल उडल्याने आरोपीदेखील आगीत होरपळला.

आगीमुळे महिलेने आरडाओरडा केल्यावर शेजारील मोबाइल दुकान चालविणारा प्रशांतकुमार देबनार दुकानाकडे धाव घेऊन महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांना आगीत लोक होरपळत असल्याचे समजताच त्यांनी पाण्याने आग विझविली. स्थानिक पोलिस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी आगीत जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. सोमवारी रात्रीच आरोपी नाथसागर याचा मृत्यू झाला.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, गुन्हे निरीक्षक सुनील थोपटे, महिला उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड यांनी भेट दिली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक शिसाळ करीत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!