पुणे- पुण्यात वाढदिवसाचा केक भररस्त्यात कोयत्याने कापणाऱ्या चौघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. ही घटना मुंढव्यातील केशवनगर भागात राजमाता जिजाऊ चौकात घडली.
सुखविंदरसिंग पप्पुसिंग टाक (वय १९, रा. हडपसर, गाडीतळ), शशांक श्रीकांत नागवेकर (वय १९), वीरेंद्र बाजीराव सस्ते (वय १८), समीर विश्वजीत खंडाळे (वय २१, तिघे रा. केशवनगर, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस कर्मचारी रमेश उगले यांनी या संदर्भात मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी वीरेंद्र सस्ते याच्या वाढदिवसानिमित्त सोशलमिडीयावर ग्रुप तयार करण्यात आला होता. सस्ते आणि त्याचे साथीदार मुंढव्यातील केशवनगर भागात राजमाता जिजाऊ चौकात सायंकाळी जमले. सस्ते आणि साथीदारांनी भरस्त्यात कोयत्याने केक कापून दहशत माजविली. या घटनेची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेले काही साथीदार पसार झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.